जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महीने पुढे ढकलण्यात आल्याने मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांवर येत्या 14 मार्च पासून प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यानुसार जामखेड पंचायत समितीवर प्रशासनाची नियुक्ती करण्यात आली आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा निकाली न निघाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहे.सरकारने या संबंधी कायदा बनवला आहे. याच्या प्रक्रियेला सहा महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो. यामुळे राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक येणार हे निश्चित होते. अखेर ग्रामविकास विभागाकडून यासंबंधी 11 मार्च 2022 रोजी शासन निर्णय घेण्यात आला आहे.
त्या निर्णयानुसार राज्यातील मुदत संपलेल्या 283 पंचायत समित्या आणि 25 जिल्हा परिषदांवर प्रशासक नेमले जाणार आहेत. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचा समावेश आहे. जामखेड पंचायत समितीची 13 मार्च 2022 रोजी मुदत संपत आहे. 14 मार्च 2022 पासून जामखेड पंचायत समितीवर प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी प्रकाश पोळ हे काम पाहणार आहेत.
जामखेड पंचायत समितीवर प्रशासकाची नेमणूक झाल्याने पंचायत समितीची निवडणूक लांबणीवर गेली हे आता अधिकृतरित्या स्पष्ट झाले.निवडणूका लांबणीवर गेल्याने इच्छुकांचा हिरमोड मात्र झाला आहे. मात्र जे नव्याने इच्छूक झाले होते, त्यांच्यासाठी जनसंपर्क वाढवण्याची, वातावरण निर्मिती करण्याची नवी संधी चालून आली आहे. त्यामुळे जुन्या आणि नव्या इच्छुकांना आपापल्या मतदारसंघात अधिक सक्रिय होऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यास अधिक वाव मिळाला आहे.
दरम्यान 14 मार्च 2022 पासुन जामखेड पंचायत समितीचा कारभार प्रशासकाच्या हाती असणार आहे. गटविकास अधिकारी प्रकाश पोळ हे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी राज्यात प्रसिध्द आहेत. पोळ हे प्रशासक म्हणून जामखेड पंचायत समितीचा कारभार यापुढे हाकणार आहेत. अगामी काळात प्रशासक म्हणून पोळ हे कशी कामगिरी करतात याकडे जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.