मोठी बातमी : अहमदनगर कृषी विभागाची मोठी कारवाई, सहा कृषि सेवा केंद्रांचे विक्री परवाने केले निलंबित,जिल्ह्यात उडाली मोठी खळबळ !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : खरीप हंगाम सन २०२३-२४ साठी शेतक-यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा व्हावा यासाठी कृषि विभागाने सूक्ष्म नियोजन केलेले आहे. त्यानुसार कृषि विभागाच्या भरारी पथकांनी जिल्ह्यात तपासणी हाती घेतली.तपासणीत दोषी आढळलेल्या कृषी सेवा केंद्रांविरोधात कृषि विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
खरीप हंगाम (kharip Hangam 2023) सुरु झालेला असुन बाजारामध्ये शेतक-यांची बि-बियाणे, खते व इतर कृषि निविष्ठा खरेदीसाठी लगबग सुरु झालेली आहे. जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण समितीही कार्यरत आहे. कृषी विभागामार्फत निरीक्षकांनी केलेल्या तपासणीमध्ये दोषी आढळून आलेल्या ४ बियाणे विक्री केंद्राचे व २ किटकनाशके विक्री केंद्रांचे परवाने निलंबीत करण्याची मोठी कारवाई कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.
“निविष्ठा उत्पादकांनी किंवा जिल्ह्यामधील निविष्ठा विक्री केंद्र चालकांनी कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन करु नये अन्यथा त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अहमदनगर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिला आहे.”
शेतक-यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठांची उपलब्धता व्हावी, कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर १ व प्रत्येक तालुका स्तरावर १ अशी एकुण १५ भरारी पथके जिल्ह्यामध्ये कार्यरत करण्यात आलेली असून भरारी पथकामार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जात आहे. शेतक-यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक करणा-या विक्री केंद्रावर तातडीने कारवाई केली जाणार असल्याचे कृषि विभागाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.