मोठी बातमी : डाॅ नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील हल्लेखोरांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) हत्याप्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील दोघा आरोपींना  प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले आहे. शनिवारी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर (S. R. Navandkar) यांच्या न्यायालयात साक्षीदाराने ही महत्वपूर्ण साक्ष नोंदवली आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डाॅ नरेंद्र दाभोळकर यांची हत्या केल्याचा आरोप निश्‍चित केलेले सचिन अंदुरे (Sachin Adure) आणि शरद कळसकर (Sharad Kalaskar) यांना शनिवारी (१९ मार्च) प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखलं आहे. अंदुरे आणि कळसकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार (Firing) केला आणि त्यानंतर दोघे तेथून फरार झाले, अशी साक्ष या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने दिली.

डाॅ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात ‘सनातन’ (Sanatan) संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. सध्या या प्रकरणातील साक्षीदारांची साक्ष सुरू आहे. या गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या पुणे महानगर (Pune Municipal Corporation) पालिकेच्या साफसफाई विभागातील कर्मचाऱ्याची शनिवारी साक्ष झाली. त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्याऱ्यांना ओळखले आहे. त्यामुळे त्यांनी न्यायालयात दिलेली ही साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरणार आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या करण्यात आली होती. घटनेच्या दिवशी साक्षीदार हे पुलावर साफ सफाई करीत होते. त्याची महिला सहकारी त्यावेळी तेथे होती. काम झाल्यानंतर ते पुलाच्या डिव्हाडरवर बसले होते. पुलाजवळील झाडावर एक माकड आल्याने आणि त्यामुळे कावळ्यांचा आवाज आल्याने त्यांनी त्या बाजूला पाहिले. तेव्हा त्यांना दोघांनी एकाला गोळ्या झाडल्या व त्यामुळे ती व्यक्ती खाली पडल्याचे पाहिले. गोळ्या झाल्यानंतर दोघे तरुण पोलिस चौकीच्या बाजूला पळाले. त्यानंतर त्यांनी दुचाकीवरून पळ काढला.

साक्षीदार डॉ. दाभोलकरांच्या जवळ गेले तेव्हा डॉ. दाभोलकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यानंतर साक्षीदार चित्तरंजन वाटीकेत साफ सफाईसाठी निघून गेले होते, अशी माहिती या खटल्यातील विशेष सरकारी वकील ॲड. प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयास दिली. हा सर्व घटनाक्रम साक्षीदारांनी साक्षीदरम्यान न्यायालयास सांगितला. तसेच अंदुरे आणि कळसकर यांनीच डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे न्यायालयास सांगितले. डॉ. दाभोलकर कुटुंबीयांच्यावतीने ॲड. ओंकार नेवगी या खटल्याचे कामकाज पाहत आहेत.