मोठी बातमी : कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ‘त्या’ उत्पादक, वितरक व विक्रेत्यांवर कडक कारवाई करा – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे आदेश | Kharip Hangam in maharashtra 2023
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Kharip Hangam 2023 : खरीप हंगामात शेतक-यांना गुणवत्तापुर्ण व दर्जेदार निविष्ठा वेळेत उपलब्ध होतील यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी.तसेच बोगस निविष्ठा विक्री व कायद्याचे उल्लंघन करणा-या उत्पादक, वितरक व विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ (Collector Siddharam Salimath) यांनी दिले.
खरीप हंगाम तयारी संदर्भात राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक (Chief Secretary Manoj Sainik) यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा घेतला.तदनंतर उपस्थित अधिकाऱ्यांची बैठक घेत जिल्हाधिकारी सालीमठ यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी निलेश कानवडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांनी कृषि निविष्ठा खरेदी करताना गुणवत्ता पूर्ण असल्याची खात्री करावी.खरेदीवेळी पक्के बील बियाण्यांची पिशवी व बियाण्यांचा एक छोटा नमुना जतन करुन ठेवावा.फसवणूक झाली तर तात्काळ तक्रार निवारण कक्षाशी संपर्क करुन आपली तक्रार लेखी नोंदवावी.
शेतकऱ्यांनी अफवांना बळी पडू नये – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
खरीपाच्या तयारीच्यादृष्टीने मुबलक प्रमाणात बियाणे व खतांचा साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे.तसेच खतांचा संरक्षित साठाही जिल्ह्यासाठी करण्यात आलेला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. सद्यस्थितीत पाऊस लांबल्याने पेरणीची घाई न करता पुरेसा पाऊस झाल्यानंतरच सर्व शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी करण्याचे आवाहन श्री. सालीमठ यांनी यावेळी केले.
शेतक-यांना खरीप हंगामात गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होण्यासाठी कृषि विभागामार्फत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे.प्रत्येक तालुका स्तरावर तक्रार निवारण समिती कार्यरत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे (Ahmednagar District Agriculture Officer Sudhakar Borale) यांनी यावेळी दिली. बैठकीस सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.