मोठी बातमी : आमदार राम शिंदे यांच्या पुढाकारातून कर्जत आणि जामखेड MIDC बाबत आज विधानपरिषदेत चर्चा, सरकार काय खुलासा करणार? कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लागले लक्ष
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : 1996 साली मंजूर आणि 1999 साली भूमिपूजन झालेल्या जामखेड MIDC च्या मुद्द्यावर महाराष्ट्र विधान परिषद नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चा होणार आहे. कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यातील एमआयडीसीबाबतची नेमकी स्थिती काय? यावर उद्योगमंत्री उदय सामंत हे या चर्चेत उत्तर देणार आहेत. आज दुपारी विधानपरिषदेत होणाऱ्या या चर्चेकडे संपुर्ण कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र विधान परिषद नियम 97 अन्वये आमदार प्रा. राम शिंदे, आमदार प्रविण दरेकर, ॲड निरंजन डावखरे हे सदस्य आपत्कालीन चर्चेत सहभागी होणार आहेत. विधानपरिषदेच्या आजच्या कामकाजात जामखेड व कर्जत MIDC च्या मुद्द्यावर अल्पत्कालीन चर्चा होणार आहे. याबाबतची माहिती माहिती आमदार प्रा.राम शिंदे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
आमदार प्रा राम शिंदे यांची ट्विटरद्वारे माहिती
आमदार प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,महाराष्ट्र विधानपरिषद सभागृहामध्ये म.वि.नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चा दुपारनंतर चर्चेला येणार आहे.
त्यामध्ये 25 वर्षांपूर्वी तालुका जामखेड येथे मंजुर असलेल्या MIDC ची सध्या काय स्थिती आहे व किती उद्योग सुरु आहेत तसेच कर्जत तालुक्यामध्ये MIDC सुरू करण्याबाबत कधी पासुन मागणी आहे, मंजुरी बाबतीत काय त्रुटी आहेत व शासन कधी पर्यंत मंजुरी देणार आहे.याबाबत चर्चा होणार असून या चर्चेला उद्योगमंत्री उदय सामंत साहेब उत्तर देणार आहेत, असे म्हटले आहे.
दरम्यान, विधानपरिषदेत नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चेत खालील मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
“अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड औद्योगिक वसाहतीची स्थापना सन 1996 मध्ये झाली असणे, जामखेड औद्योगिक क्षेत्र भूखंड क्र. ए1 व ए2असून क्षेत्रफळ 19.72 हे. आर असणे, तसेच कर्जत तालुक्यात औद्योगिक वसाहत सुरू करण्याबाबत तत्कालीन पालकमंत्री यांनी विशेष पुढाकार घेतलेला असणे, त्यासंदर्भात तत्कालीन उद्योगमंत्री यांच्या समवेत माहे एप्रिल, 2016मध्ये संबंधीत लोकप्रतिनिधींनी त्या कालखंडात बैठक घेवून व तद्संबंधी शासनाकडे पाठपुरावा केलेला असणे, कर्जत तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी औद्योगिक वसाहत निर्माण करणे व त्या ठिकाणी उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणे, परंतु सन 2019 ते सन 2022 या कालावधीत सदर प्रस्तावास कोणतीही चालना तत्कालीन शासनाने दिली नसणे, जामखेड औद्योगिक वसाहतीत जमीन संपादन केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मावेजा दिला आहे किंवा कसे सद्य:स्थितीत जामखेड औद्योगिक वसाहतीमधील उद्योग आणण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही गेल्या 27 वर्षांपासून जामखेड येथील औद्योगिक वसाहत सुरू असताना त्या ठिकाणी कोणकोणते उद्योग सुरू आहेत, याबाबत शासनाने माहिती देण्याची आवश्यकता, तसेच सदर औद्योगिक वसाहतीमध्ये कोणकोणत्या गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक नवीन उद्योग उभारण्यासाठी केली असल्याची संपूर्ण माहिती शासनाने देण्याची आवश्यकता, कर्जत व जामखेड हे तालुके जवळपास असून सुद्धा जामखेड येथील सुरू असलेल्या अ औद्योगिक वसाहतीत कोणतेही नवीन उद्योग आले नसणे, कर्जतमध्ये औद्योगिक वसाहत सुरू करण्यासाठी व या भागातील नव युवकांना रोजगार देण्याबाबत शासन कोणती भूमिका घेतलेली असणे, या नवीन औद्योगिक वसाहत मंजुरीबाबत सद्य:स्थिती काय आहे व नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग उभारण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागणार आहे, याबाबत शासनाने केलेली वा करावयाची कार्यवाही”
वरिल मुद्द्यांवर विधानपरिषदेत चर्चा होणार असून उद्योग मंत्री उदय सामंत यावर उत्तर देणार आहेत. कर्जत जामखेड मतदारसंघात दोन्ही MIDC च्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्यामुळे संपुर्ण मतदारसंघाचे याकडे लक्ष लागले आहे.