अमृत महा आवास अभियान 3.0 स्पर्धेचा निकाल जाहीर ; जामखेड पंचायत समिती व अरणगाव ग्रामपंचायत नाशिक विभागात प्रथम !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अमृत महा आवास अभियान 3.0 (Amrit Maha Awas Mission 3.0) स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात जामखेड पंचायत समिती व अरणगाव ग्रामपंचायतने राज्यपुरस्कृत आवास योजनेत नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जामखेड पंचायत समितीच्या या कामगिरीचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या कुशल नेतृत्वाखाली जामखेड पंचायत समितीने मागील दोन वर्षांपासून घरकुल योजनेमध्ये आघाडी घेतली आहे. उपक्रमशील प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असलेल्या गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी विविध उपक्रम राबवत जामखेड तालुक्यातील गोरगरीब जनतेला हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. प्रस्ताव मंजुरीपासून ते घरकुले पुर्ण होण्यापर्यंत लाभार्थ्यांचे त्यांनी सातत्याने प्रबोधन केले. यामुळे जामखेड तालुक्यातील 97 टक्के घरकुले पूर्णत्वास आली.
शासनाकडून विविध घटकांसाठी घरकुल योजना राबवली जाते. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या नेतृत्वाखाली विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, रोजगार सेवक, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता या सर्वांनी मोठी मेहनत घेतली. त्यामुळे जामखेड पंचायत समितीचा फलित अमृत महाआवास अभियान 3.0 स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा डंका वाजला. जामखेड पंचायत समितीने राज्य पुरस्कृत आवाज योजनेत नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर आरणगाव ग्रामपंचायतनेही राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नाशिक विभागामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
गटविकास अधिकारी प्रकाश पोळ हे जामखेड पंचायत समितीत रूजू झाल्यापासून जामखेड पंचायत समितीची कामगिरी उंचावली आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जामखेड पंचायत समिती बक्षिसे जिंकू लागली आहे. यामुळे जामखेडचे नाव राज्य पातळीवर अभिमानाने झळकू लागले आहे.
दरम्यान, अमृत महा आवास अभियान 3.0 स्पर्धेत नाशिक विभागातून जामखेड पंचायत समितीने पहिला क्रमांक पटावल्यानंतर गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले,जामखेड तालुक्यातील घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी प्रशासनाला सहकार्य व मार्गदर्शन केले. जामखेड पंचायत समितीला मिळालेल्या या यशाचे श्रेय हे माझे एकट्याचे नसुन या यशाचे खरे श्रेय लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, गावोगावचे सरपंच, तालुक्यातील पत्रकार यांचे आहे.
पोळ पुढे म्हणाले, जामखेड पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी ज्या ज्या वेळी घरकुल भेटीसाठी जात होते, त्या त्या वेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, संबंधित गावचे ग्रामपंचायत सरपंच – उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सक्रिय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांना मोठी मदत केली. तसेच तहसीलदार योगेश चंद्रे यानी गौण खनिजाबाबत वेळोवेळी मदत केल्याने काम अधिक सोपे झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त. मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, प्रकल्प संचालक सुनीलकुमार पठारे, तसेच DRDA चे साळवे साहेब आणि टीम यांनी सातत्याने पाठपुरावा केला. CEO साहेबांनी प्रत्येक तालुक्याला जाऊन 2-3 बैठका घेतल्या, DRDA ने तांत्रिक अडचणी।सोडविण्यासाठी रात्र दिवस प्रतिसाद दिला, यामुळे काम करण्यास चालना मिळाली, असे यावेळी बीडीओ प्रकाश पोळ यांनी आवर्जून नमूद केले.
जामखेड पंचायत समिती व आरणगाव ग्रामपंचायतने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, सहायक गविअ कैलास खैरे, विस्तार अधिकारी बी के माने, शंकरराव गायकवाड, सिद्धनाथ भजनावळे, सुनील मिसाळ सरपंच अंकुश शिंदे, ग्रामसेवक विनोद खुरंगुळे, सुजित पवार, रुपेश वाघमारे, संकेत पंचमुख, प्रीतम दीक्षित तसेच सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.