Bhaskar More Jamkhed latest news Today : डाॅ भास्कर मोरेच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बुधवारी रात्री यश आले आहे. (Bhaskar More Arrest) विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी भास्कर मोरे हा गेल्या आठवडाभरापासून फरार होता. त्याला इंदापूर तालुक्यातील भिगवन येथे अटक करण्यात आली आहे. उसाच्या शेतातून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी भास्कर मोरे याला आज गुरूवारी जामखेड न्यायालयासमोर हजर केले. जामखेड न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरचा संस्थापक अध्यक्ष असलेल्या डाॅ भास्कर मोरे विरोधात त्याच्याच संस्थेतील शेकडो विद्यार्थ्यांनी 5 मार्च 2024 पासून तीव्र अंदोलन हाती घेतले आहे. डाॅ भास्कर मोरेंकडून गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी आणि विद्यार्थीनींची आर्थिक, मानसिक, शारीरिक छळवणूक, पिळवणूक केली जात असल्याच्या विद्यार्थ्याचा आरोप आहे. या अंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी भास्कर मोरेंविरोधात एका विद्यार्थीनीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होता भास्कर मोरे हा जामखेडमधून फरार झाला होता.
रत्नदीप शैक्षणिक संकुलातील अनियमितता, आर्थिक लुटमार, अन्याय, अत्याचार, या विरोधात रत्नदीप कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गेल्या दहा दिवसांपासून जामखेड तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे पांडूराजे भोसले यांनी उपोषणाचे आंदोलन हाती घेतले आहे.भास्कर मोरेला अटक करावी आणि त्याचबरोबर इतर शैक्षणिक मागण्या पुर्ण कराव्यात या मागणीसाठी हे अंदोलन सुरु आहे.
गेल्या दहा दिवसांपासून रत्नदीपचे आंदोलक विद्यार्थी व उपोषणकर्ते पांडूराजे भोसले, आण्णासाहेब सावंत व इतर सामाजिक व राजकीय संघटनांच्या प्रतिनिधीनींनी अतिशय आक्रमकपणे आपल्या मागण्या प्रशासन आणि शासनापर्यंत पोहचवल्या. अंदोलनाच्या 9व्या दिवशी आमदार प्रा राम शिंदे यांनी अंदोलकांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.आमदार प्रा.राम शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांसह संबंधित खात्यांच्या मंत्र्यांचे या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले. शासनाने या अंदोलनाची दखल घेतली.सरकारने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे.त्याचबरोबर विनयभंगाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी डाॅ भास्कर मोरे याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली आहे.
भास्कर मोरे विरोधात शेकडो विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या आक्रमक अंदोलनातील अनेक महत्वाच्या मागण्या आता मार्गी लागल्या आहेत. अनेक विद्यापीठांच्या चौकश्या समित्यांनी अंदोलनाला व काॅलेजला भेट दिली. विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपांमध्ये या समित्यांना तथ्य आढळून आले. अनेक धक्कादायक बाबी या ठिकाणी उघडकीस आल्या. आज अंदोलनाचा 10 वा दिवस आहे. काॅलेज बदलून मिळावे ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी अजूनही निकाली निघालेली नाही. ही मागणी सरकारने तातडीने मार्गी लावावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
भास्कर मोरे चालवत असलेल्या सर्व काॅलेजच्या मान्यता रद्द करण्यात येणार असल्याचे अश्वासन संबंधित खात्यांच्या मंत्र्यांनी दिले आहे, त्याची अंमलबजावणी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भास्कर मोरेने विद्यार्थ्यांकडून घेतलेली ज्यादा फी माघारी मिळावी अशीही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.
दरम्यान, बुधवारी रात्री रत्नदीपचा संस्थापक डाॅ भास्कर मोरे याला इंदापूर तालुक्यातील भिगवन येथून अटक करण्यात आली. भिगवन येथील एका ऊसाच्या शेतात मोरे हा लपून बसला होता. त्याला तेथून अटक करण्यात आली. अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली. गुरूवारी पहाटे मोरे याला जामखेड पोलिसांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. जामखेड पोलिसांनी भास्कर मोरे याला दुपारी 3:30 च्या सुमारास जामखेड न्यायालयात हजर केले. जामखेड न्यायालयाने मोरे याला एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.भास्कर मोरेला अटक केल्यानंतरचा फोटो गुरुवारी सोशल मिडीयावर तुफान वायरल झाला आहे.
डाॅ भास्कर मोरे याच्याविरोधात यापुर्वी एका विद्यार्थीनीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर होता. सुप्रीम कोर्टानकडून त्याने जामिनावर मिळवला होता. या घटनेला वर्ष उलटत नाही तोच भास्कर मोरेंविरोधात आणखीन एका विद्यार्थीनीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने भास्कर मोरे हे राज्यात पुन्हा चर्चेत आले होते.आता या प्रकरणात मोरेला अटक झाली आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार वनविभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यात भास्कर मोरे याला कधी अटक होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.