जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने नोटीस बजावली आहे. काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी छापेमारी केली होती. त्यांनतर आता रोहित पवार हे ईडीच्या रडारवर आले आहेत. बारामती ॲग्रो व इतर काही काही व्यवहाराबद्दल ईडीला संशय असल्याने ईडीने रोहित पवारांना नोटीस बजावली आहे. येत्या बुधवारी अर्थात २४ जानेवारीला पवार यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहे. ईडीच्या या कारवाईमुळे रोहित पवार यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात रोज काहीना काही खळबळ उडवून देणाऱ्या घटना घडत असल्याचे पहायला मिळते , आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या गोटात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांचे नातू तथा आमदार रोहित पवार हे आज ईडीच्या रडारवर आले आहेत. यापूर्वी पवार यांच्या कंपनीवर आयकर विभागाने धाड टाकली होती. आता रोहित पवारांना ईडीने चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतची नोटीस ईडीकडून जरी करण्यात आली आहे.
ईडी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास करत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित लिलावात जी कारवाई राबवण्यात आली होती त्यावेळी बारामती अॅग्रो कारखान्याचा जो संबंध होता त्याप्रकरणी रोहित पवार यांची चौकशी केली जाणार आहे. विशेष म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या लिलावात फेरफार करुन कन्नड सहकारी साखर कारखाना अवघ्या 50 कोटी रुपयात खरेदी केला होता. या प्रकरणी ईडीने चौकशी करावी”, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे केली होती. किरीट सोमय्या यांच्या आरोपांनंतर ईडीने रोहित पवार यांच्या कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर आता त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्या आलं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावल्याची बातमी ताजी असतानाच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर यांनाही ईडीने नोटीस बजावली आहे.कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहेत. ईडीने किशोरी पेडणेकर यांना येत्या गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. किशोरी पेडणेकर यांना याआधीदेखील ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. दरम्यान, “माझ्या हाती ईडीचं समन्स येईल तेव्हा मी प्रतिक्रिया देईन”, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी देखील तपास केला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास सुरु असतानाच ईडीनेदेखील या प्रकरणाची दखल घेत समांतर तपासाला सुरुवात केली. ईडीने या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. किशोरी पेडणेकर यांना याआधीदेखील समन्स बजावण्यात आलं होतं. त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी ईडीने समन्स बजावलं आहे.