कार्यकर्त्यांच्या गर्दीने चोंडी पुन्हा फुलली, आमदार राम शिंदे आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रमास हजारो नागरिकांनी लावली हजेरी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । 28 ऑक्टोबर 2022 । भाजपा नेते तथा माजी मंत्री राम शिंदे विधानपरिषदेचे आमदार बनल्यानंतर यंदा पहिल्यांदाच चोंडीत दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कर्जत-जामखेड मतदारसंघासह राज्यभरातील शिंदे समर्थकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
आमदार राम शिंदे हे फडणवीस सरकारच्या काळात राज्याचे मंत्री असताना नेहमी कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलणारी चोंडी मागील काही गर्दी विना होती, परंतू यंदा कार्यकर्त्यांच्या गर्दीने चोंडी पुन्हा एकदा फुलून गेली होती. यंदा गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले.
आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत चोंडी कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दुरावलेले अनेक कार्यकर्ते तसेच शिंदे समर्थक आमदार राम शिंदे यांच्या भेटीसाठी चोंडीत दाखल झाले होते. राम शिंदे यांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांसह सामान्य माणसांनी केलेली मोठी गर्दी लक्षवेधी ठरली.
दिवसभर आमदार राम शिंदे यांचा बंगला नागरिकांच्या गर्दीने फुलून गेला होता. दिवाळी फराळाच्या कार्यक्रमासाठी नागरिकांनी केलेली मोठी गर्दी आता चर्चेचा विषय बनली आहे. आमदार राम शिंदे यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाल्याचेच संकेत आजच्या कार्यक्रमाने दिले आहेत.
दिवाळी फराळासाठी आलेल्या प्रत्येक लहान सहान कार्यकर्त्यापासून मोठ्या नेत्यांचे स्वता: राम शिंदे हे स्वागत करत होते. ते सर्वांची आस्थेवाईकपणे चौकशी करत संवाद साधत होते. राम शिंदे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी कार्यकर्त्यांची चढाओढ लागली होती.
आमदार राम शिंदे यांच्या निवासस्थानी आयोजीत दिवाळी फराळ कार्यक्रमासाठी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार डाॅ.सुजय विखे-पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, तसेच जिल्ह्यातील अनेक महत्वाचे नेते पदाधिकारी यांनी हजेरी लावली होती.आज पार पडलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमासाठी हजारो नागरिकांनी हजेरी लावली. सर्वांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. दिवाळी फराळासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती.