जामखेड टाइम्स वृत्तसेवा। रिक्षा चालकाने पैसे जास्त घेतले…रिक्षा चालक भाडे नाकारता… रिक्षा चालक अरेरावी करतात.. अशाच प्रकारचे किस्से नेहमी आपल्या कानी पडतात. परंतू जामखेड शहरातील एका रिक्षा चालकाने एक नवा आदर्श समोर आणला आहे. (Citizens appreciate the honesty of rickshaw puller Sadiq Shaikh)
जामखेड शहरातील सादिक शेख या रिक्षा चालकाच्या रिक्षामध्ये एका प्रवासी महिलेची बॅग विसरली होती. दिवसभर अनेक भाडे केल्यानंतर ती बॅग नेमकी कोणत्या महिला प्रवाशाची आहे याचा मेळ लागत नसल्याने रिक्षाचालक सादिक शेख यांनी सदर बॅग जामखेड पोलीस स्टेशनला जमा केली होती.
जामखेड पोलिसांनी सदर बॅग परत करण्यासंदर्भात महिला प्रवाश्याचा शोध घेतला असता,सदर बॅग जामखेड शहरातील शिवाजीनगर भागात राहणार्या सुुनिता हजारे यांची असल्याचे निदर्शनास आले. सुनिता हजारे ह्या आपले पेशंट घेऊन सादिक शेख यांच्या रिक्षातून घरी गेल्या होत्या. घाईत असल्याने त्यांची बॅग रिक्षात विसरली होती.
दरम्यान 9 जूलै 2022 रोजी जामखेड पोलिस स्टेशनमध्ये सुनिता हजारे यांची बॅग जामखेड पोलिसांनी परत केली. या बॅगमध्ये सोन्याची दागिणे, घड्याळ, आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या. सादिक शेख यांनी कुठल्याही मोहाला बळी न पडता सदर महिलेची मौल्यवान वस्तू असलेली बॅग पुन्हा परत करत प्रामाणिकपणाचा नवा आदर्श घालून दिला आहे. सदर महिलेला बॅग परत मिळताच ती आनंदून गेली होती. रिक्षा चालक सादिक शेख आणि जामखेड पोलिसांचे सदर महिलेने आभार मानले.
सादिक शेख हे जामखेड शहरातील मोरेवस्ती भागात राहतात. अतिशय गरिब कुटुंबातील सादिक शेख हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सादिक शेख यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. शेख यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी पोलीस नाईक अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शेळके, पोलीस कॉन्स्टेबल आबासाहेब आवारे, रिक्षा युनियनचे उपाध्यक्ष असिफ सय्यद, सचिव नासिर खान, समीर शेख, कय्यूम शेख, आशिर बागवान, अशपाक सय्यद सह आदी यावेळी उपस्थित होते.