जामखेड टाईम्स वृत्तसेवा, दि, 31 डिसेंबर 2021। नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पाथर्डी नगरपरिषदेच्या नगररचना विभागाच्या लिपिकाने लाच मागितल्याप्रकरणी पाथर्डीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पाथर्डी शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर असे की, बिअरबार व परमिटचा परवाना काढण्यासाठी आवश्यक असलेल्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी पाथर्डी येथील एकाने पाथर्डी नगरपरिषदेकडे अर्ज केला होता.
सदर नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पाथर्डी नगरपरिषदेच्या नगर रचना विभागातील लिपिक अंबादास गोपीनाथ साठे (वय 44) याने अर्जदाराकडे 25 हजाराच्या लाचेची मागणी केली होती.
लाचेची मागणी करताना लिपिक साठे याने मुख्याधिकारी लांडगे यांच्याकरिता या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने अहमदनगर लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
लाच मागितल्याची पडताळणी करण्यासाठी अहमदनगर लाचलुचपत विभागाने 26 नोव्हेंबरला पंच आणि तक्रारदाराला पाथर्डीला पाठवले होते. त्यावेळी लिपिक अंबादास साठे याने 25 हजारा ऐवजी 12 हजार रुपयांच्या लाखेच्या बदल्यात काम करून देण्याचं मान्य केले होते.
मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने लिपिक साठे हा 12 हजार रुपयांची लाच मागत असल्याचे पंचांसमोर रेकॉर्ड झालं होतं.लिपिक अंबादास साठे याने लाचेची मागणी केली असली तरी प्रत्यक्षात तो सापळ्या अडकला नाही.
मात्र, त्याने लाचेची मागणी केल्याचा पुरावा पथकाकडे होता. त्यानुसार आज 31 डिसेंबर 2021 रोजी लिपिक अंबादास साठे याच्याविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1888 च्या 7 अ नुसार पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईमुळे पाथर्डीत मोठी खळबळ उडाली आहे.
सदरची कारवाई उपअधीक्षक डीवायएसपी हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे, पोलीस अंमलदार रमेश चौधरी, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, हरून शेख, राहुल डोळसे यांच्या पथकाने केली.