Oxygen Park : जामखेड – हळगाव कृषि महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत ऑक्सिजन पार्क प्रकल्पाचा शुभारंभ !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : 15 ऑगस्ट 2023 : Oxygen Park : बेसुमार वृक्षतोडीमुळे जागतिक तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे हवामानाचा समतोल ढासळू लागला आहे.याचा परिणाम हिवाळा, उन्हाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूत दिसून येत आहे. पर्यावरण रक्षणासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत महाविद्यालयाच्या परिसरात ‘ऑक्सिजन पार्क’ (Oxygen Park) प्रकल्पाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत येत असलेल्या जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ७६ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पोपट पवार, सहाय्यक प्राध्यापक डॉ. मनोज गुड, सहाय्यक प्राध्यापक शारीरिक शिक्षण डॉ. राहुल विधाते सह आदी उपस्थित होते.
यावेळी डाॅ गोरक्ष ससाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. देशाप्रती असणारी आपली कर्तव्य पार पाडावेत. तसेच आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन ससाणे यांनी यावेळी केले. महाविद्यालयाच्या परिसरात ‘ऑक्सिजन पार्क’ प्रकल्प का राबविण्यात येणार याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जामखेड तालुका अवर्षण प्रवण क्षेत्रात येतो. यामुळे या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. कमी पावसाच्या या प्रदेशात कमी पाण्यावर तग धरू शकणारी झाडे लावण्यावर महाविद्यालयाचा भर असणार आहे.हळगाव कृषि महाविद्यालयात उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन पार्क प्रकल्पाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे, इतर शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वड, पिंपळ, कडूनिंब, रेनट्री अशा विविध 1000 झाडांचा ‘ऑक्सिजन पार्क’ मध्ये समावेश करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘ मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत वड, पिंपळ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.