Ahmednagar District Bank । अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळूंकेंची निवड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द पाळला

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । कर्जत ।  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांची अहमदनगर जिल्हा बँकेच्या (Ahmednagar District Bank) तज्ञ संचालकपदी शुक्रवारी निवड करण्यात आली.

त्यांच्या निवडीचे कर्जत शहर आणि तालुक्यात स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निष्ठावान व्यक्तीला न्याय दिल्याची प्रतिक्रिया अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

काही महिन्यांपुर्वी पार पडलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बाळासाहेब साळुंके यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका तथा पंचायत समितीच्या माजी सभापती मिनाक्षी साळुंके यांना केवळ एका मता अभावी भाजपाच्या अंबादास पिसाळ यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला होता. पुरेसे संख्याबळ असताना अनेकांनी पक्षात राहत कुरघोडी केल्याने साळुंके यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

या पराभवाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेत मुंबईतील एका कार्यक्रमात गद्दारी केलेल्या कर्जत तालुक्यातील स्थानिक नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. यासह विजयाची खात्री असतानाही पराभवासाठी अप्रत्यक्षपणे घडवून आणलेल्या घडामोडींनी आ.रोहित पवार देखील निराशा झाले होते.

एकाच गोटात राहून घडलेला सर्व नाट्यमय प्रकार पाहता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बाळासाहेब साळुंके यांना निवडीबाबत शब्द दिला होता. शुक्रवार दि २६ रोजी राष्ट्रवादीच्या कोट्यातून बाळासाहेब साळुंके यांची ‘तज्ञ संचालक’ म्हणुन निवड करत त्यांच्या निष्ठेची कदर करीत आपला शब्द त्यांनी पाळला. यासह कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत मास्टरस्ट्रोक देत महाविकास आघाडी बळकट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

प्रामाणिकपणे केलेल्या कामास योग्य न्याय

जिल्हा बँकेतील पराभव आपल्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, आ रोहित पवार यांच्या जिव्हारी लागला होता. मात्र आपण आपली पक्षीय निष्ठा कधीच दूर केली नाही. आज तिघांच्या सहकार्याने आपली निवड झाली याबद्दल आभार मानतो. राजकारणात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळतो याचे समाधान आहे अशी प्रतिक्रिया नुतन संचालक बाळासाहेब साळुंके यांनी व्यक्त केली.