कोरोनाचा कर्जतला मोठा दणका :सोमवारी गाठली पंधरा दिवसांतील उच्चांकी रुग्णसंख्या
आजमितीस कर्जत शहर आणि तालुक्यात ४३० ऍक्टिव्ह कोरोना केसेसची नोंद
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : रविवारी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील जामखेड तालुक्याला कोरोनाने मोठा दणका दिल्याने जामखेड तालुका हादरून गेला होता आज (सोमवारी,दि २६ रोजी) कोरोनाने कर्जत तालुक्याला मोठा हादरा दिला आहे
कर्जत तालुक्यात सोमवारी (दि २६ रोजी) पुन्हा कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून एकाच दिवशी तब्बल ८३ रुग्ण आढळले आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी केले आहे. आजमितीस कर्जत शहर आणि तालुक्यात ४३० ऍक्टिव्ह कोरोना केसेसची नोंद आहे.
कर्जत शहर आणि तालुक्यातील कोरोनाबाधीत रुग्णाची वाढती संख्येने पुन्हा एकदा तालुका प्रशासनाची झोप उडविली आहे. मागील पंधरा दिवसांपासून कोरोनाचा वाढता आकडा सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी वाढविणारा ठरत आहे.
सोमवार, दि २६ रोजी एकाच दिवशी मागील पंधरा दिवसांतील उच्चांकी रुग्णसंख्या कोरोनाने गाठली आहे. सोमवारी एकूण १ हजार ७७ व्यक्तीची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल ८३ व्यक्तीचा कोरोना अहवाल प्रशासनास सकारात्मक प्राप्त झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड यांनी दिली आहे.
तर ४९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात करीत सुखरूप आपले घर गाठले आहे. आजच्या कोरोनाबाधीत संख्येने प्रशासनाने देखील कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आठवडे बाजार असल्याने दुपारी ठीक चार वाजताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस गस्त घेत सर्व व्यवहार वेळेत बंद करीत नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले. यासह अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडी दिसल्यास दंडात्मक कारवाईचा बडगा उचलण्याचा इशारा दिला आहे.