Darshana Pawar murder case : MPSC दर्शना पवारच्या मृत्यूनंतर मित्राची भावनिक पोस्ट, अचानक रूममधून पुस्तके, नोट्स चोरीला गेले पण ती खचली नाही, तीने यश मिळवले पण दुर्दैवाने…
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Darshana Pawar murder case: अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव येथील दर्शना पवार या 26 वर्षीय तरुणीचा राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी अर्धवट कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेत दर्शना पवार हिची हत्या झाल्याची बाब वैद्यकीय अहवालातून उघड झाली आहे. MPSC परिक्षेत घवघवीत यश संपादन करून RFO रेंज फाॅरेस्ट ऑफिसर बनलेल्या दर्शना पवारच्या मृत्यूने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. तिची हत्या कोणी व कोणत्या कारणासाठी केली याचा पोलिसांना अजूनही सुगावा लागलेला नाही. तिच्या सोबत राजगड किल्ल्यावर गेलेला तिचा मित्र राहूल हंडोरे (Rahul Handore) अजूनही गायब आहे.
कठोर मेहनतीच्या बळावर RFO बनलेल्या दर्शना पवार हिच्या मृत्यूमुळे संपुर्ण कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. दर्शनाचे वडील चालक आहे. एका ड्रायव्हरच्या लेकीने अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण केल्याने तिचं कुटूंब, नातेवाईक, गावकरी मोठ्या आनंदात होते.परंतू दुर्दैवाने दर्शना घातपाताची शिकार ठरली. दर्शनाच्या मृत्यूचं गुढ उकलण्यासाठी पोलिस वेगाने तपास करत आहेत. दर्शनाला राजगडावर घेऊन जाणारा तिचा मित्र राहूल हंडोरे गायब झाला आहे. त्याच शेवटचं लोकेशन कोलकाता येथे असल्याचं पोलिस तपासात समोर आलं होतं. राहूल हंडोरे याला पकडण्यासाठी पोलिस त्याच्या मागावर आहेत. याशिवाय तपासाच्या दृष्टीने अनेक शक्यतांवर पोलिसांचा वेगाने तपास सुरु आहे.
दर्शना पवारचा मित्र/ परिचित असलेल्या उद्देश कृष्णा पवार (Uddesh Krusha Pawar) या तरुणाची एक भावनिक पोस्ट सध्या सोशल मिडीयावर जोरदार वायरल झाली आहे. उद्देश हा MPSC चा विद्यार्थी आहे. त्याने दर्शना पवारचा खडतर प्रवास जवळून बघितला आहे. दर्शनाचे शव ससून रुग्णालयात आणल्यानंतर तो त्याठिकाणी गेला होता.तेव्हा त्याने त्याठिकाणी बघितलेल्या दृश्यानंतर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.याबाबतचा ब्लाॅग त्याने लिहिला आहे. सध्या तो ब्लॉग अनेकांनी सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
आपल्या ब्लॉगमध्ये उद्देश पवार लिहतो की,
दर्शना……🌿
माझ्या समोर ससून हॉस्पिटलच शवागृह आहे.
दर्शनाचा शव शवविच्छेदनासाठी इथे आणलय आता. जेव्हापासून ही बातमी कानावर आलीय, मी एकदम सुन्न आहे. तिथे गेल्या गेल्या सगळी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.सहज एखाद्याच्या डोळ्यात पाणी येईल असा शेवट झालाय दिदीचा.एखाद्याने हे इतकं क्रूर का असावं?
वडील साधे ड्राइवर म्हटले आता कुठे दिवस पालटले होते लेकीने.दर्शना अभ्यासात प्रचंड हुशार दहावीला ९५%, बारावीला ९८%,गणित विषयाची पदवीधर,कोपरगावच्या SSGM महाविद्यालयाची आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार विजेती, आणि पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पहिल्या पाच क्रमांकात येऊन गणित विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
सुरुवातीला UPSC ची तयारी करत होती.पहिल्या दीड वर्षात बऱ्यापैकी syllabus नोट्स सहित पूर्ण केलेला आणि अचानक रूम मधून पुस्तके नोट्स चोरीला गेले.खचलेल्या दर्शनाला आता नेमकं काय करायचं कळत नव्हत तितक्यात MPSC च्या RFO परिक्षेचा आपण फॉर्म भरलाय हे तिच्या लक्षात आलं. त्वरित अभ्यास सुरु केला. पूर्व परीक्षा पास झाली. मुख्य परिक्षाही पास झाली आणि विशेष म्हणजे हा सगळा अभ्यास तिने गावी केला होता.
मुलाखतीच्या तयारीसाठी ती काही वेळ पुण्यात होती. मुलाखतीचा टप्पा सुद्धा यशस्वीपणे पार पाडून लागलेल्या निकालात तीची RFO पदावर निवड झाली होती.यात तिचा संघर्ष सांगताना कित्यकांचे डोळे पाणावले.गावात मिरवणूक निघाली. कित्येक ठिकाणी सत्कार झाले आणि या सगळ्यात दर्शना व तिच्या घरातले खुश होते.पण अचानक हे घडलय. घरातले अजून धक्क्यात आहेत, सापडलेली मुलगी आपली नाहीय हे त्यांना सतत वाटतंय पण दुर्दैवाने ती दर्शनाच आहे.
हे नेमकं काय झालय हे पोलीस तपासात उघड होईलच पण दीदींनो जपा स्वतःला,नका ठेऊ एखाद्यावर सहज विश्वास. थोडा वेळ जाऊ द्या..घरातल्यांसोबत सतत संवाद ठेवा जे जे काही वाटतय ते शेयर करत जा.
आणि दादांनो दीदींनो दोघांनाही सांगतो राग आलाय तर ओरडा, चिडा, हव असल्यास मर्यादा ओलांडून वाट्टेल ते बोला.माणूस दुखावेल आणि काही दिवसांनी शांत होईल पण दोघांचं आयुष्य सुखरुप राहील.
ससून मधून रात्री उशिरा निघताना अचानक लक्षात आलं की आज फादर्स डे आहे आणि बाप थंड झालेल्या चहाचा कप आणि फोडलेल्या बिस्किट पुड्यातलं एकही बिस्किट न खाता येणाऱ्या जाणाऱ्याकडे फक्त मिटमीट डोळ्याने पाहतोय….
ईश्वरा आपण माणूस आहोत याचा विसर पडू देऊ नकोस रे कोणाला…..
– उद्देश