जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत यंत्राच्या साहाय्याने गवत काढण्यासाठी गेलेल्या शेतकरी पती-पत्नीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ शिवारात घडली. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जालिंदर एकनाथ कांबळे (वय ३३), नीता जालिंदर कांबळे (वय २७, दोघेही राखुंटेफळ, ता. शेवगाव) असे मृत्यू झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. जालिंदर कांबळे हे पत्नी नीतासह सकाळच्या सुमारास आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी गेले होते. दरम्यान, बॅटरीवर चालणारे खुरपणी यंत्र त्यांनी नेले होते.
पेरणी यंत्राची पुढील बाजू जालिंदर कांबळे यांनी धरली होती. यंत्राची बाजू निता कांबळे यांच्याकडे होती. गवत काढीत असताना शेतामध्ये अंथरलेल्या वीज वाहक केबलला यंत्राची पुढील बाजू चिकटली त्यामुळे जालिंदर यांना विजेचा धक्का बसला. त्या पाठोपाठ पत्नी नीता कांबळे यांनाही विजेचा धक्का बसला
यावेळी तिथेच जवळ खेळत असलेल्या त्यांच्या लहान मुलगा व मुलीने घटना पाहिली घाबरलेल्या मुलांनी मोठयाने ओरडत धावत जाऊन हा प्रकार आजीला सांगितला. यावेळी आजीनी शेतकऱ्यांना मदतीसाठी जोरजोराने हाक मारली असता तिथे उपस्थित शेतकऱ्यांनी धावत जाऊन तत्काळ केबलमधील वीज प्रवाह बंद केला.
त्यानंतर दोघांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सायंकाळी उत्तरीय तपासणी झाल्यानंतर पती-पत्नीवर उशिराने अंत्यसंस्कार करण्यात आले.शनिवारी (दि. २३) सकाळी अकराच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या पश्चात आई, वडील, मुलगी स्नेहल (वय ३) दीड वर्षाचा लहान मुलगा भाऊ, भावजय असा परिवार आहे.