जामखेड : आमदार राम शिंदेंच्या मागणीला देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा..!
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती श्रीक्षेत्र चोंडी याठिकाणी मोठ्या उत्साहात अन् थाटामाटात पार पडली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो अहिल्याभक्तांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जयंती उत्सव सोहळ्यात स्वागताध्यक्ष आमदार प्रा.राम शिंदे यांनी केलेली मागणी, त्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला पाठिंबा, त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली मोठी घोषणा जयंती उत्सव सोहळा गाजवणारी ठरली. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जयंती उत्सव सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आमदार प्रा.राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात जोरदार बॅटिंग केली.
मागील वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमीत येऊन राजकारण करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांचं सरकार जयंतीनंतर अवघ्या 20 दिवसांत घालवलं.जगातल्या सगळ्यांना हेवा वाटेल अशी त्रिशताब्दी जयंती आपण साजरी करू, असे सांगत आमदार प्रा.राम शिंदे यांच्यासह पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्सव समिती महाराष्ट्र राज्य यांच्या मागणीनुसार अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करणार, अशी मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 जयंती सोहळ्याचे श्री क्षेत्र चोंडी येथे 31 मे 2023 रोजी आयोजन करण्यात आले होते. कर्जत-जामखेडचे भाग्यविधाते आमदार प्रा.राम शिंदे हे या जयंती सोहळ्याचे स्वागताध्यक्ष होते. राज्यभरातून आलेल्या लाखो अहिल्या भक्तांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होत अभिवादन केली. यावेळी चोंडी परिसर अहिल्या भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे दुपारी चोंडीत आगमन झाले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे माहेरचे वंशज आमदार प्रा.राम शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व इतर मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरासह शिल्पसृष्टीची पाहणी करत शिवमंदिराचे घेतले. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले. यावेळी पार पडलेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. तत्पूर्वी जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 14 कर्तृत्ववान महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
आमदार प्रा.राम शिंदे यांच्या मागणी अन् सभेत जल्लोष
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष तथा आमदार प्रा.राम शिंदे यांनी फडणवीस सरकारच्या काळात धनगर समाजाच्या हितासाठी घेतलेल्या अनेक निर्णयाची माहिती देण्याबरोबरच छत्रपती संभाजीनगर, धाराशीव या जिल्ह्यांच्या नामांतराचा जसा निर्णय सरकारने घेतलाय तसाच निर्णय अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा घेऊन अहमदनगरचे नामांतरण अहिल्यानगर करावे अशी मागणी करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात जोरदार स्वागत केले.
अहिल्यादेवींचे कर्तृत्व हिमालायएवढे म्हणून अहमदनगरचे नाव बदलण्याचा निर्णय
यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अहिल्यादेवींच्या माहेरचे आडनाव शिंदे होते आणि मी पण शिंदेच आहे. त्यामुळे काळजी करू नका,आपल्या सर्वांच्या मनात जे जे आहे ते पुर्ण करण्याचा प्रयत्न करू, अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय, हा निर्णय आमच्या काळात होतोय हे आमचे भाग्य आहे.अहिल्यादेवींचे कर्तृत्व हिमालायएवढे आहे त्यामुळेच त्यांचे नाव अहमदनगर जिल्ह्याला देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याचा मानही तेवढाच वाढणार असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या मातीत जन्म घेतला त्या मातीचे आपल्यावर खूप मोठे ऋण
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की,श्रीक्षेत्र चोंडी येथे येण्याची मला संधी मिळाली. मी स्वता:ला भाग्यवान समजतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या मातीत जन्म घेतला त्या मातीचे आपल्यावर खूप मोठे ऋण आहे. इथली माती कपाळी लावावी. सर्वांनी या मातीच्या स्मृती जतन कराव्यात. अहिल्यादेवींनी समाजातल्या सर्व स्तरातील जनतेच्या कल्याणासाठी काम केले. अहिल्यादेवी होळकर यांच्या राजकारभरातील अनेक गोष्टींचा दाखला आजही दिला जातो. प्रशासकीय कारभाराचा उत्तम धडा त्यांनी दिला. भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी त्यांनी दिली आहे. ती सर्वोत्तम आणि अनुकरणीय असल्याचे सांगत राज्यात कार्यरत असलेलं युतीचे सरकारही सर्वसामान्यांचे सरकार असून सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार आहे. राज्यात कालच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ सुरू करण्यात आली असून याद्वारे केंद्राचे सहा हजार व राज्याचे सहा हजार असे एकूण १२ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलताना दिली.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही राज्याचा कारभार करत आहोत. त्यामुळे तुमच्या सर्वांची इच्छा लवकरच पुर्ण होईल. अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी घोषणा केली.आजच्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य आम्हाला लाभले याचादेखील आम्हाला अभिमान आहे.
छत्रपतींचा मावळा मुख्यमंत्री आहे… अहिल्यनगर तर होणारच
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या कल्याणाच्या जेवढ्या मागण्या आहेत तेवढ्या पुर्ण करण्याची ताकद आणि शक्ती माता अहिल्यादेवींनी आम्हाला द्यावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी संबंध देशात केला.अहिल्यादेवींनी न्यायप्रिय शासन चालवलं, स्वता:च्या तिजोरीतून अहिल्यादेवींनी देशभरातील मंदिरांचा जिर्णोद्धार करण्याचं काम केलं. तुमच्या सर्वांच्या मागणीनुसार अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करावं यासाठी मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नाव केल, उस्मानाबादचे धाराशिव नाव केलं, आता तुमच्याच नेतृत्वात अहमदनगरचे नाव अहिल्यानगर झालं पाहिजे, अशी मागणी यावेळी फडणवीस पुढे म्हणाले की, मला विश्वास आहे, छत्रपतींचा मावळा मुख्यमंत्री आहे,अहिल्यानगर तर होणारच, असा विश्वास यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला.
दरवर्षी धनगरांसाठी 25 हजार घरे देणार – देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
फडणवीस पुढे म्हणाले की, सरकारने धनगर समाजाकरिता वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत. महामंडळ स्थापन करून त्यासाठी 10 हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. कुठलेही व्याज न घेता मेंढपाळांना कर्ज देण्याचा निर्णय घेतलाय. 25 वर्षांपासून मागणी असलेलियी पावसाळ्यात चराईची जमीन राखून ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. धनगर वाड्यांना जोडण्याकरिता रस्त्यांची योजना सुरु केली आहे. तसेच 22 वेगवेगळ्या योजनांचा लाभ धनगर समाजाला सरकारने उपलब्ध करून दिला आहे. सरकार सत्तेवर येताच 1 हजार कोटी रूपयांची तरतुद धनगर समाजासाठी पहिल्या पुरवणी मागण्यात केली. अहिल्यादेवींच्या ठायी संघर्ष होता, आपल्या मनात जे जे काही आहे ते आम्ही पुर्ण करू. दरवर्षी धनगरांसाठी 25 हजार घरे देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, अशी घोषणा यावेळी फडणवीस यांनी केली.
त्रिशताब्दी जयंती उत्सवाला पंतप्रधानांनी पवित्र भूमित यावे – आमदार प्रा.राम शिंदे
विरोधीपक्ष नेता असताना माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांनी 1994 ला चोंडीला भेट दिली होती.1995 ला युतीचे सरकार राज्यात सत्तेवर तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी चोंडीला भेट दिली. या भेटीत त्यांनी चोंडी विकास प्रकल्पासाठी 2 कोटीचा निधी दिला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना सोलापुर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले. त्याचबरोबर चोंडीपासून जवळच असलेल्या हळगाव येथे 65 कोटी रूपये खर्चून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयाची स्थापना केली.
पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांची जयंती शासनाच्या वतीने व्हावी ही मागणी करताच त्यांनी लगेच ही मागणी मान्य करत यावर्षी शासकीय जयंती साजरी करण्याचा निर्णय अंमलात आणला. धनगर समाजासाठी 1 हजार कोटी रूपयांची तरतुद केली. 2025 ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती साजरी होणार आहे. ही जयंती देशभर साजरी व्हावी. सरकारने बहृत अराखडा तयार करून त्याला मान्यता द्यावी आणि विविध कामे मार्गी लावावीत तसेच या जयंतीसाठी पंतप्रधानांनी या पवित्र भूमीला भेट दिली पाहिजे अशी मागणी, यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांनी केली.
बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवींचं नाव द्या – आमदार गोपीचंद पडळकर
ज्यांना अहिल्यादेवींचा विचार मान्य, ज्यांना होळकरांचा इतिहास मान्य नाही अश्या लबाड लांडग्याला आपण मागच्या वर्षी हाकलून लावलं, प्रशासन आणि पोलिसांच्या आडून लढाई लढता येत नाही. 300 वी जयंती महाराष्ट्रात नवी ऊर्जा आणणारी ठरणार आहे. मेंढपाळांच्या मुलांना नामांकित इंग्रजी शाळेत शिक्षणाची योजना सरकारने आणली आहे. सरकारने राज्यात 10 नव्यी सूतगिरण्यांना मंजुरी द्यावी. फडणवीस सरकारने सोलापुर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले हा आपला सन्मान आहे. महाराष्ट्रातील सगळ्या ग्रामपंचायतीत दोन दोन महिलांचा सन्मान केला. हा निर्णय धनगर समाजाचा सन्मान वाढवणारा आहे. आम्हाला आरक्षण द्या आम्ही संरक्षण देण्याचे काम करू, महाराष्ट्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने 50 सांस्कृतिक भवन निर्माण करण्याचा निर्णय सरकारे घेतलाय.जी लोकं आपले सन्मान करतायेत त्यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करा. जिथं गरज पडेल तिथं बाळूमामा झालं पाहिजे आणि जिथं गरज पडेल तिथे बापू बिरू होण्याची गरज आहे. बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवींचं नाव द्यावे, अहमदनगर चं नाव बदलून अहिल्यानगर करावं, असे यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.
यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमाचे आभार पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मानले. यावेळी माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई राम शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार सुरेश धस, माजी आमदार भिमराव धोंडे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी खासदार विकास महात्मे, माजी आमदार पोपटराव गावडे, रमेश शेंडगे, रामराव वडकुते, लक्ष्मणराव ढोबळे, नारायण आबा पाटील, सह आदी नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी स्थानिक भाजपा नेते कार्यकर्ते तसेच राज्यभरातून आलेले अहिल्याभक्त यावेळी उपस्थित होते.