जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी भरीव निधी देण्याची घोषणा नुकतीच केली होती.अवघ्या 15 दिवसांच्या आत ही घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरी करून दाखवली आहे. त्यांनी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी तब्बल 5 कोटी रूपयांचा निधी मंजुर केला आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अर्थात जो जसा बोलतो तसा वागतो याचाच प्रत्यय यानिमित्ताने कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेला आला आहे.
कर्जतचे ग्रामदैवत संत गोदड महाराज मंदिर परिसराचा प्रादेशिक पर्यटन योजनेतून विकास व्हावा, अशी मागणी भाविकांकडून सातत्याने होत होती. या मागणीनुसार आमदार प्रा राम शिंदे यांनी काही दिवसांपुर्वी संत गोदड महाराज मंदिरात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पर्यटन विभागाकडे विकास कामांचा प्रस्ताव पाठविण्याचा शब्द दिला होता, त्यानुसार आमदार प्रा.राम शिंदे यांनी गोदड महाराज मंदिर परिसराचा परिपूर्ण प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. त्यातच 11 मार्च 2023 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्जत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांनी गोदड महाराज मंदिराला भेट देऊन गोदड महाराजांचा आशिर्वाद घेतला होता.
त्यानंतर पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील पर्यटनस्थळांसह गोदड महाराज मंदिर परिसराचा प्रादेशिक पर्यटन योजनेतून विकास करण्यासाठी भरीव निधी देण्याची घोषणा केली होती.अवघ्या 15 दिवसाच्या आत फडणवीस यांनी ही घोषणा खरी करून दाखवली आहे. कर्जत येथील श्री संत गोदड महाराज मंदिरासाठी तब्बल 3 कोटी 50 लाख रूपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत मतदारसंघासाठी 5 कोटींचा निधी मंजुर झाला आहे. तसा शासन निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून 23 मार्च 2023 रोजी जारी करण्यात आला आहे.
पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत सन 2022-23 मध्ये कर्जत जामखेड मतदारसंघातील 2 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. कर्जतचे ग्रामदैवत संत गोदड महाराज मंदिर परिसरात विविध पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारने 3 कोटी 50 लाखांचा निधी मंजुर केला आहे. या निधीतून संत गोदड महाराज मंदिर परिसरात भाविकांसाठी प्रवेशद्वार, पाण्याची टाकी, सभामंडप, पुरुष व महिलांसाठी स्वच्छतागृह बांधणे, परिसरातील रस्ते काँक्रीटीकरण व सुशोभीकरण करणे सह आदी कामे केली जाणार आहेत. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी निकाली निघाली आहे. यामुळे कर्जत शहरातील जनता आणि भाविकांमधून आमदार प्रा.राम शिंदे यांचे आभार मानले जात आहेत.
जागृत देवस्थान अशी ओळख असलेल्या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी आमदार प्रा.राम शिंदे नेहमी जामखेड तालुक्यातील मोहरी येथे जात असतात. या देवस्थानचा प्रादेशिक पर्यटन योजनेतून विकास व्हावा अशी मागणी मोहरी ग्रामस्थ आणि भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत आमदार प्रा.राम शिंदे यांनी मोहरी येथील जगदंबा देवस्थानचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. आमदार राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.
प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत मोहरी येथील श्री क्षेत्र जगदंबा देवी मंदिर परिसराच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून 1 कोटी 50 लाखांचा निधी मंजुर झाला आहे. या निधीतून भाविकांसाठी प्रवेशद्वार, पाण्याची टाकी, सभामंडप, महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह, परिसरातील रस्ते काँक्रीटीकरण व सुशोभीकरण, मुख्य रस्त्याचे बांधकाम करणे ही कामे केली जाणार आहेत.
आमदार प्रा राम शिंदे यांनी कर्जत जामखेड मतदारसंघाच्या विकासासाठी सरकार दरबारी असलेले राजकीय वजन वापरून गेल्या काही दिवसांत 130 कोटी रूपयांहून अधिकचा निधी खेचून आणला आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात हाती घेतलेल्या विकासाच्या या झंझावातामुळे मतदारसंघातील जनतेत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे जनतेत आमदार प्रा.राम शिंदे यांची लोकप्रियता वाढू लागली आहे.
“कर्जतचे ग्रामदैवत संत गोदड महाराज आणि मोहरी येथील जगदंबा मंदिर ही दोन्ही तीर्थस्थानांवर माझी अपार श्रध्दा आहे.या तीर्थक्षेत्रांचा विकास व्हावा यासाठी मी नेहमी प्रयत्नशील होतो.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जतच्या सभेत दिलेला शब्द पाळत तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी भरीव निधी मंजुर केला. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेच्या वतीने मी मनापासून आभार मानतो. कर्जत-जामखेड मतदारसंघात जास्तीत जास्त निधी खेचून आणणे व त्यातून जनहिताची विविध कामे मार्गी लावणे हेच माझे लक्ष आहे.”