मोठी बातमी : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर उधळला भंडारा, राज्यात उडाली खळबळ, नेमकं कारण काय ? वाचा सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचे गेल्या 10 दिवसांपासून उपोषणाचे अंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षणावरून राज्याचं सामाजिक व राजकीय वातावरण तापले आहे. अश्या परिस्थितीत धनगर समाजानेही आता आरक्षणासाठी अंदोलनाची हाक दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी येथे धनगर समाजातील काही नेत्यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यातच आता आज धनगर आरक्षणाचे पडसाद सोलापुरात उमटले.
मराठा आरक्षणापाठोपाठ आता राज्यात धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पेटत असल्याचे चित्र आहे. कारण, आज सोलापूरमध्ये धनगर आरक्षण कृती समितीच्या सदस्याने सोलापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळून राग व्यक्त केला आहे. धनगर आरक्षण कृती समितीच्या सदस्यांनी विखे पाटलांवर भंडारा उधळल्याची घटना उघडकीस येताच राज्याच्या राजकारणातून मोठी खळबळ उडाली आहे.
महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी धनगर आरक्षण कृती समितीच्या सदस्यांनी त्यांची भेट घेतली. आरक्षण मागणीचे निवेदन दिले. मंत्री विखे हे सदरचे निवेदन वाचत असतानाच शंकर बंगाळे यांनी आपल्या खिशातून एक पुडी बाहेर काढत विखे पाटलांच्या डोक्यावर भंडारा उधळला. अचानक झालेल्या या प्रकाराने गोंधळ उडाला होता. यावेळी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांसह भाजपा कार्यकर्त्यांनी अंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांना चोप देण्यात आला. विखे पाटलांवर भंडारा उधळल्यानंतर धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने धनगर समाज घटनादत्त एसटी आरक्षणाची त्वरीत अंमलबजावणी करावी, आणि त्याच बरोबर ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लावू नये, यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना निवेदन दिले. आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना काळे फासायला धनगर समाज मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा यावेळी धनगर आरक्षण कृति समितीचे सदस्य शंकर बंगाळे यांनी दिला आहे.