दादा पाटील महाविद्यालयात डिक्शनरी अवेरनेस प्रोग्राम | Dictionary Awareness Program, Dada Patil College karjat
जामखेड टाईम्स वृत्तसेवा | 12 जानेवारी | Dictionary Awareness Program, Dada Patil College Karjat | रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयातील कर्मवीर भाऊराव पाटील ग्रंथालय व आयक्यूएससी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिक्शनरी अवेरनेस प्रोग्राम’ चे उद्घाटन राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनी प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांना अभ्यासात सातत्याने मदत व्हावी, विविध विषयांतील कठीण शब्दांचे अर्थ, संज्ञा, संकल्पना अभ्यासता याव्यात. या हेतूने हिंदी, मराठी, इंग्रजी, संस्कृत या भाषांचे शब्दकोश, परिभाषा कोश स्वतंत्र कक्ष स्थापित करून ते विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.
या कक्षाचे उद्घाटन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नगरकर म्हणाले की, स्वामी विवेकानंद हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे जागतिक स्तरावरील उत्तम उदाहरण आहेत. कोणतेही ज्ञान मिळविण्याचा मार्ग हा अभ्यासातून वा वाचनापासून सुरू होतो. विवेकानंदांनी मिल, स्पेन्सर अशा अनेक विचारवंतांची पुस्तके वाचली. त्यांचा प्रभाव त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपयोगी ठरला. ते युवकांचे प्रेरणास्थान ठरले. म्हणून विवेकानंदांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय युवा दिन ‘म्हणून साजरा केला जातो.
युवा पिढीसाठी त्यांच्या जन्मदिनी महाविद्यालयात आपण ‘डिक्शनरी अवेरनेस प्रोग्राम’सुरू करत आहोत. त्याचा महाविद्यालयातील युवकांनी सातत्याने लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. नगरकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल बबन कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.संतोष लगड यांनी केले, तर आभार आयक्यूएसीचे समन्वयक डॉ संदीप पै यांनी मानले. यावेळी प्रा.भास्कर मोरे यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.