अंदुरे बंधूंविरोधात डाॅ भगवान मुरुमकरांचे खळबळजनक आरोप ! “मुरूमकरांनी वाचला ‘नाजुक’ प्रकरणांचा पाढा”, ….तर राजकीय संन्यास घेऊन जेलमध्ये बसायला तयार – मुरुमकरांची घोषणा
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। 27 ऑक्टोबर 2022 । भाजपाचे वजनदार नेते तथा जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर यांच्याविरोधात 50 लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर डाॅ भगवान मुरुमकर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतूून त्यांनी आपल्यावर खोट्या स्वरूपाचा खंडणीचा गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगत आपली बाजू मांडली. ही बाजू मांडत असताना त्यांनी केलेल्या काही गंभीर आरोपांमुळे तालुक्यात एका वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे.
भाजपा नेते डाॅ भगवान मुरुमकर यांनी पत्रकार परिषदेतून आपल्यावरील आरोपांचे खंडन करत, खंडणीचे आरोप सिध्द झाल्यास राजकीय संन्यास घेण्याची मोठी घोषणा केली. त्याचबरोबर ज्या अंदुरे कुटूंबाने मुरुमकर यांच्याविरोधात खंडणीचे आरोप केले आहेत, त्या अंदुरे कुटूंबावरही मुरूमकर यांनी खळबळ उडवून देणारे गंभीर आरोप केले आहे. अंदुरे भावंडांच्या ‘नाजूक’ कुटाण्यांचा पाढाच मुरुमकर यांनी पत्रकार परिषदेत मांडला. यावेळी पत्रकार परिषदेत विलास मोरे, भरत जगदाळे उपस्थित होते.
राजकीय द्वेषापोटी कोणाच्या तरी खांद्यावर बंदुक ठेवून भगवान मुरुमकरला बदनाम करण्याचे षडयंत्र
यावेळी आपली भूमिका मांडताना डाॅ भगवान मुरुमकर म्हणाले की, “काल परवा माझ्या विरोधात खंडणीचा खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या 22 वर्षाच्या राजकारणात, मी जर कोणाकडे खंडणी मागितली असेल तर, मी राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे.माझ्या राजकीय जीवनामध्ये, मी रस्त्यावर उभा राहून लोकांची मी कामं करतोय, मी विकास कामं करतोय, लोकांच्या सुख दु:खात धावून जातोय, हे काही लोकांना सहन होत नसेल, त्यामुळे राजकीय द्वेषापोटी कोणाच्या तरी खांद्यावर बंदुक ठेवून भगवान मुरुमकरला बदनाम करण्याचे षडयंत्र चालू आहे, असा दावा त्यांनी केला.”
उमेश अंदुरे ह्यांनी दारूच्या नशेत स्वता: हून माझ्या वाॅट्सअपला मेसेज टाकले
पुढे बोलताना मुरुमकर म्हणाले की, “अंदुरे बंधूंच्या बाबतीत जामखेडच्या वडाखाली भांडण झालं, हा विषय तालुक्यात सर्वश्रुत आहे. त्या भांडणात माझा कुठलाच संबंध नाही, मी त्या भांडणात नाही, पण त्या भांडणा अगोदरच्या घटना पाहिल्या तर, त्या घटनेमध्ये हे जे पाईप दुकानदार उमेश अंदुरे आहेत ह्यांनी दारूच्या नशेत स्वता: हून माझ्या वाॅट्सअपला काही मेसेज टाकले होते. त्यांचा माझ्याकडे नंबर नव्हता. मी तो ट्रुकाॅलरला (truecaller) चेक केला. त्यानंतर मी त्यांना विचारणा केली की, तुम्ही कोठे आहेत? ते म्हटले मी अहमदनगरलाय, ठिकयं म्हणलं, आल्यावर फोन करा, याच्यापेक्षा त्यांच्याशी माझं दुसरं बोलणं झालं नाही, त्यांचा आणि माझा एकदाच फोन झालाय.त्यानंतर त्यांचा मुलगा सागरला मी सांगितलं होतं की, तुझ्या वडिलांनी असा -असा विषय केलाय, लोकांच्या पण माझ्याकडे तक्रारीत येत आहेत.”
उमेश अंदुरे हा एका गल्लीमध्ये दारू पिऊन गेला आणि कुणाच्या तरी घरात…
“हे जे म्हणतात, आम्ही व्यापारी आहोत, व्यापाऱ्यावर अन्याय केला, व्यापाऱ्यावर हल्ला केला, हे व्यापारी रोज रात्री 9 ते 12 या वेळेत जामखेड शहरात काय कुटाणे करतात हेही लोकांना माहित व्हावं, ज्या वेळेस हा उमेश अंदुरे एका गल्लीमध्ये दारू पिऊन गेला आणि कुणाच्या तरी घरात घुसला आणि कड्या वाजवत होता, मोठ्या मोठ्याने कालवा करत होता, तेव्हा मला गल्लीतून फोन आले की, दादा आमच्या गल्लीत असा असा प्रकार चालूयं, पोलिसांना फोन करा, त्यावेळेस, मी पोलिस निरीक्षक गायकवाड साहेब यांना फोन केला आणि या घटनेची माहिती दिली. असे प्रकार अंदुरे बंधूंकडून पैश्याच्या जोरावर होत आहे. ह्याची आपण जरा चौकशी करा. त्या दिवशी सौताडा घाटात अपघात झाल्यामुळे गायकवाड साहेब तिथे जाऊ शकले नाहीत, गायकवाड साहेब म्हटले की, गणपतीचा पिरियड सुरुयं, माझ्याकडे आज गाडी नाही, मला काही जाता येत नाहीय.”
रेस्ट हाऊसच्या पाठीमागील प्लाॅटींगमध्ये अश्लील चाळे करताना कार्यकर्त्यांनी चोप दिला
त्यानंतर दोन दिवसानंतर हाच प्रकार घडला. तेव्हा गल्लीतून फोन आले. तेव्हा मी काही ठराविक कार्यकर्त्यांना सांगितलं की, त्याला समजावून सांगा, गल्लीतले लोकं भयभीत होतायेत, रोज दारू पिऊन तो रोज कुठल्याही कड्या वाजवतोय, कुणाच्याही घरात घुसतोय, हे जे प्रकार आहेत, मागच्या महिन्यात दोन्ही अंधुरे बंधूंकडून घडलेत. तसेच चिंचपूर फाट्याजवळची जी मदरसा शाळा आहे तिथे शशिकांत अंधुरे याला तिथल्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. पैसे देऊन ते प्रकरण मिटवलं, रेस्ट हाऊसच्या पाठीमागील जे प्लाॅटींग आहे तिथे उमेश अंदुरेचे जे काही अश्लील चाळे चालू होते, त्यावेळेस काही कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला, त्यावेळेसच खरं पाहता त्याने पोलिस स्टेशनला जायला पाहिजे होतं, की आम्हाला यांनी मारलयं, का मारलयं हा विषय अंधारात होता, पण वडाखाली मारल्यामुळे हा विषय रस्त्यावर आला.
मी कुठल्याही व्यापाऱ्याला साधी शिवीसकट आजपर्यंत कधी दिली नाही
“व्यापाऱ्यांना ते वेगळ्या पध्दतीने सांगतात, आम्ही व्यापारी आहोत, तुम्ही आम्हाला मदत करा, पण माझी सगळ्या व्यापाऱ्यांना एक विनंती आहे की, अत्तापर्यंतच्या राजकारणात मी कुठल्याही व्यापाऱ्याला साधी शिवीसकट कोणाला कधी दिली नाही, प्रत्येक व्यापाऱ्याच्या सुख दुखा:त धावून जातोय, एक वेळ जेव्हा अतिक्रमणाचा विषय आला तेव्हा रात्री 11 वाजता अमितशेठच्या दुकानासमोर बैठक घेतली, नाईट ड्रेसवर मी व्यापाऱ्यांसोबत त्या वेळेस त्या बैठकीस बसलो, तसेच व्यापाऱ्यांचा जेव्हा गाळ्याचा विषय आला त्यावेळेस तहसिलमधील जाहिर सभेत मी त्यांना पर्याय सांगितले होते, गाळे कसे कसे कुठं काढता येतील, असे अनेक प्रश्न व्यापाऱ्यांचे होते, व्यापाऱ्यांना सदैव आमचा मदतीचा हात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना कुठं भयभीत करणं किंवा हे करणं असे प्रकार माझ्या आयुष्यात कधी घडले नाहीत, आणि पुढेही घडणार नाहीत असे मुरुमकर म्हणाले.”
विरोधकांनो राजकारण समोरासमोर करा…
माझं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी अश्या स्वरूपाचे जे षडयंत्र विरोधकांकडून रचले जात आहेत, त्यांनाही माझी एक विनंती आहे, राजकारण समोरासमोर करा, माझ्या विरोधात निवडणूक लढवा, निवडणूकीत हरवा, त्याबद्दल माझं दुमत नाही, परंतु कोणाच्या तरी खांद्यावर बंदुक ठेवून खंडणीच्या विषयामध्ये माझं नाव घेतलं नाही पाहिजे किंवा ह्याला प्रवृत्त नाही केलं पाहिजे, ही माझी विरोधकांना विनंती आहे.
हॅलो म्हणलं की आलो या युक्तीप्रमाणे…
“ज्या-ज्या वेळेस निवडणूका येतात, त्या त्या वेळेस जनता उत्तर देते, आतापर्यंत असे अनेक प्रसंग आले, परंतू मी चुकीचा का बरोबर हे माझे मतदार ठरवतात, अत्तापर्यंत सहा निवडणूका झाल्यात, त्यात 2000 सालची एक ग्रामपंचायत निवडणुक हरलो मी, त्याच्यानंतर आजतागायत एकही निवडणूक मी हरलो नाही,मी सदैव लोकांच्या सुख दुखा:त आहे. हॅलो म्हणलं की आलो या युक्तीप्रमाणे मी गेली दहा वर्षे तालुक्याच्या राजकारणात काम करतोय.” असे मुरुमकर म्हणाले.
म्हणून कोणाच्या चिंगळ्या चापायची मला आवश्यकता नाही
“गेल्या दहा वर्षाच्या काळात मी कधी एक रुपयाची ठेकेदारी केली नाही, एक रूपयाचा कधी मी दोन नंबरचा धंदा केला नाही, माझ्या वडिलांची शेती आहे. शेतीच्या उत्पन्नावर माझं कुटुंब व्यवस्थित चालतयं, माझ्या कुटूंबात जवळ जवळ सहा माणसं नोकरी करतात, आठ – नऊ लाख रूपये शासनाचा पगार माझ्या कुटुंबाकडे येतोय, त्यामुळं मला कोणाच्या चिंगळ्या चापायची आवश्यकता नाही, कोणाला खंडणी मागणं हा माझा धंदा नाही, माझा पेशा नाही, माझ्या जीवनात कधी तो करणार नाही” अश्या स्पष्ट शब्दांत मुरूमकर यांनी आपली भूमिका मांडली.
…तर मी राजकीय संन्यास घेऊन जेलमध्ये पण बसायला तयार
माझी पोलिसांना विनंती आहे की, आपण माझ्यावरील आरोप सिध्द करावा, मी स्वता:हून जेलमध्ये बसायला तयार आहे. जो पर्यंत माझ्यावरील आरोप सिध्द होत नाहीत तोपर्यंत आपण त्या घटनेची चौकशी करावी, अंदुरे बंधूच नाही तर सगळ्याच व्यापाऱ्यांकडे चौकशी करावी, भगवान मुरुमकरने जर कोणाला फोन करून दोन रूपये मागितले असतील, तर मी राजकीय संन्यास घेऊन जेलमध्ये पण बसायला तयार आहे, अशी घोषणा यावेळी डाॅ मुरुमकर यांनी केली.
अंदुरे कुटुंबिय प्लॅन करून, ठरवून होते…
“परवा रात्री जामखेडच्या वडाखाली जे भांडणं झालं, त्या भांडणामध्ये भरत जगदाळे त्या हाॅटेलमध्ये आगोदरच बसले होते, उमेश अंदुरे दारू पिऊन त्याच्यासमोर गेले आणि उमेश अंदुरेने भांडणाची सुरूवात केली, अंदुरे कुटुंबिय प्लॅन करून, ठरवून होते, सर्वांनी येऊन ज्या वेळेस भरतवर अटॅक केला, त्यावेळेस भरतच्या शेजारी पान टपरीवर आजबे आणि डिसले हे त्याचे दोन भाचे होते. ज्यावेळेस त्यांच्या मामाला मारत होते त्यावेळेस भाच्यांनी पुढे जाऊन भांडणं सोडवायचा प्रयत्न केला असता त्या दोघांनाही मार लागला आहे.” असे मुरुमकर म्हणाले.
अंदुरे बंधूंनी जामखेडमधील तीन कुटूंब उध्वस्त केली
“भरत जगदाळेवर अंदुरे कुटुंबिय आणि त्यांच्या दुकानातील कामगारांनी अटॅक केला हे साऱ्या जनतेने पाहिलं आहे, दारूच्या नशेत येऊन वाद कोणी वाढवलाय आणि ज्यावेळेस तो वाद वाढला त्यावेळेस सगळ्या जामखेडच्या जनतेनं तो वाद पाहिला, चुका हे करतात आणि दोष लोकांना देतात, त्यांनी अत्तापर्यंत केलेले कुटाणे जामखेडकरांना माहित नव्हते, व्यापारी म्हणून लोकं त्यांना चांगल्या नजरेनं पाहत होते, परंतू व्यापारी म्हणून हे पैश्याच्या जोरावर यांनी जामखेडमधील तीन कुटूंब उध्वस्त केली आहेत, अश्या स्वरूपाची यांची व्यापारी लाईन आहे. त्यामुळे माझी सगळ्या व्यापाऱ्यांना विनंती आहे की, या व्यापाऱ्यापासून सावध रहा.” असे मुरुमकर म्हणाले.
रात्री अपरात्री वाॅटसअप मेसेज करतात
दुकानात जर लेडीज गिर्हाईक गेलं तर वेगवेगळ्या योजनेच्या नावाखाली त्यांचे नंबर घेतले जातात आणि त्यांना रात्री अपरात्री वाॅटसअप मेसेज करतात अशी यांची संस्कृती आहे, त्यामुळे अंदुरे यांच्यापासून लोकांनी सावध रहावं, असे सांगत डाॅ भगवान मुरूमकर यांनी पत्रकार परिषदेत उमेश आणि शशिकांत या दोघा अंदुरे भावांच्या ‘नाजूक’ कुटाण्यांचा पाढा वाचला, मुरूमकर यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे जामखेड तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे.
दरम्यान, डाॅ भगवान मुरुमकर यांनी अंदुरे भावांविरोधात ‘नाजुक’ प्रकरणाचे आरोप केल्याने खंडणी प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. नाजूक प्रकरणाच्या आरोपांवर अंदुरे कुटुंबीय काय उत्तर देणार याकडे जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.