उपक्रमशील शाळा व ध्येयवादी शिक्षक हीच शिक्षण विभागाची खरी मालमत्ता – कैलास खैरे, दत्तवाडी शाळेत नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । ‘मिशन आपुलकी’ हा जिल्हा परिषद अहमदनगरचा राज्याला दिशादर्शक असा स्तुत्य उपक्रम असून या उपक्रमांतर्गत लोकसहभागातून शाळेला भौतिक सुविधांची पूर्तता व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी केली जाते. दत्तवाडी शाळेने लोकसहभागातून दिवाळीच्या सुट्टीत आयोजित केलेले शिबीर हा त्याचाच एक भाग आहे. उपक्रमशील शाळा व ध्येयवादी शिक्षक हीच शिक्षण विभागाची खरी मालमत्ता आहे, असे गौरवोद्गार गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे यांनी काढले.
अहमदनगर जिल्हा परिषदच्या ‘मिशन आपुलकी ‘ या उपक्रमांतर्गत जामखेड तालुक्यातील धोंडपारगाव येथील दत्तवाडी जि.प.प्रा.शाळेेत लोकसहभागातून सात दिवसीय नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मार्गदर्शन शिबीर नुकतेच संपन्न झाले. संपूर्णत: मोफत व अनिवासी स्वरूपाचे असलेल्या या शिबिराच्या समारोप कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
दत्तवाडी शाळेत महात्मा गांधीजींच्या ‘थ्री एच’ विकसन प्रणालीनुसार (हेड,हर्ट &हँड) विद्यार्थ्यांचा बौद्धिक,भावनिक व शारिरीक असा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पूरक अशा नाविन्यपूर्ण सहशालेय उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी केली जाते. दिवाळी सुट्टीत शाळेने नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा शिबिराचे आयोजन केले. सात दिवस हे शिबिर सुरु होते.
प्रविण शिंदे (मळईवस्ती)रविंद्र भोसले (खांडवी) या नवोदय विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या प्रकट मुलाखतीने शिबिराचा प्रारंभ झाला. शिबीरकाळात ‘यशोदीप’ प्रकाशनाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांवर आधारित अनेक दर्जेदार पुस्तकांची निर्मिती केलेल्या प्रसिद्ध लेखिका मंगल आहेर गावडे (पुणे), कायझेन अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अहमदनगरचे महेश डाळींबकर, माधव घाडगे(बीड), सुदाम शिंदे (जवळा), बाळासाहेब जरांडे (पवारवस्ती),विक्रम डोळे (मुंगेवाडी),’गोष्ट विश्वविक्रमाची’ या प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका ज्योती नागरगोजे (जामखेड) जि.प.अहमदनगरचा सन २०२२चा जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका अनिता पवार पिंपरे (लटकेवस्ती), भगवान साळुंके (पिंपरखेड),केशव हराळे(पाडळी), ‘लक्ष्य नवोदय ‘ या पुस्तकाचे लेखक रफी शेख(जालना) यांनी शिबिरात सहभागी झालेल्या २२ शाळांतील ९० विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या दृष्टीने भाषा, गणित व मानसिक क्षमता चाचणी या विषयांवर घटकनिहाय मार्गदर्शन केले.
नान्नज व खर्डा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.सुरेश कुंभार, ‘सेवाश्रय’ फाउंडेशनच्या माध्यमातून अनाथ बालके, विधवा महिला व गरजू कुटुंबे यांच्या कल्याणासाठी सेवाभावी वृत्तीने काम करणारे पाथर्डी येथील अनुराधा व पोपट फुंदे हे शिक्षक दांपत्य, विश्वदर्शनचे गुलाब जांभळे, नवीन मराठी प्राथ शाळा जामखेडचे विश्वस्त उमेश देशमुख, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर यांनी शिबिरास सदीच्छा भेटी देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
समारोप सोहळ्यात दत्तवाडी शाळेतील अवधुत लोहार या विद्यार्थ्याच्या ‘बोलावा विठ्ठल’ आणि विक्रम बडे सरांनी छोटेसे बहीण भाऊ हे गीत सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी सक्षम सानप व सार्थक ओमासे (पिंपरखेड), जिया भामुद्रे (पवारवस्ती), अर्पिता हजारे (दत्तवाडी), जयेश कचरे (घोडेगाव), लक्ष्मी लटके (लटकेवस्ती),आर्या दहीकर (पाडळी) व अक्षरा शिंदे (जवळा) यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून तर अविनाश बोधले व सीमा सानप यांनी पालक प्रतिनिधी म्हणून आपले शिबिरातील अनुभव कथन केले व शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती , पालक शिक्षक संघ व माता पालक संघ दत्तवाडी तथा धोंडपारगाव ग्रामस्थांचे आभार मानले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जेधे (काकडेवस्ती ) यांनी प्रभावीपणे व ओघवत्या शैलीत केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशिलकुमार धुमाळ, उपाध्यक्ष मारूती सराफ, श्रीराम कुमटकर, कमलताई सुभाष पवार, बाळासाहेब येवले, तुषार जेधे, दत्तात्रय धुमाळ, पार्वती इनामदार, कृषी अधिकारी विकास सोनवणे,बळीराम शिंदे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, परशुराम नागरगोजे, राधाबाई तुपविहिरे, अरूणाताई औटे या मान्यवरांनी शिबिरार्थींना शिबीर काळात अल्पोपहार व्यवस्था केली होती.
पिंपरखेड व घोडेगाव येथील शिबिरार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांनी आर्थिक स्वरूपात सहकार्य केले. समारोप सोहळ्यात भोजनाची व्यवस्था हरिदास पावणे सर यांनी केली होती.दत्तवाडी शाळेत प्रतिनियुक्तीवर उत्कृष्ट काम केल्याबद्दल खुंटेवाडी शाळेचे उपाध्यापक योगेश तुपविहीरे यांचा गट शिक्षण अधिकारी कैलास खैरे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
दत्तवाडी शाळेचे मुख्याध्यापक मनोहर इनामदार यांच्य संकल्पनेतून व अथक परिश्रमातून या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. इनामदार यांनी शिबिराच्या आयोजनाचा उद्देश, स्वरूप व आवश्यकता स्पष्ट करून सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक व शिक्षणप्रेमी दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने हे शिबीर यशस्वीपणे संपन्न झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शाळा व्यवस्थापन समिती दत्तवाडीचे सदस्य तथा नागेश विद्यालयाचे अध्यापक संतोष पवार यांनी आभार व्यक्त केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी नान्नज केंद्राचे केंद्रप्रमुख बाबासाहेब कुमटकर, शिबिरार्थी विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ मंडळ धोंडपारगाव तसेच तालुक्यातील अनेक शिक्षक बांधवांचे विशेष योगदान लाभले.