जामखेड : जवळ्याच्या लेकीची राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री, भुजबळ यांची राष्ट्रीय कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाच्या सहप्रभारीपदी नियुक्ती !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। कायम दुष्काळी तालूका अशी ओळख असलेल्या जामखेड तालुक्यातून कोणी महिला कुठलाही राजकीय वारसा नसताना स्व कर्तृत्वाच्या बळावर राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री मारेल ही कल्पना जशी अशक्यप्राय गोष्ट असली तरी पक्षात धडाडीने काम केल्यास पक्ष नक्कीच त्याची दखल घेतो. याचाच प्रत्यय आलाय जामखेड तालुक्यातील जवळा गावच्या लेकीला. त्यांचं नाव आहे मंगल भूजबळ.
मंगल भूजबळ ह्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सक्रीय आहेत. अतिशय निडर आणि धडाडीच्या कार्यकर्त्या अशी ओळख असलेल्या मंगल भूजबळ यांनी काँग्रेस पक्षात केलेल्या कामाची पक्षाकडून दखल घेण्यात आली आहे. पक्षाने त्यांना राष्ट्रीय राजकारणात काम करण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.
कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मान्यतेने व राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांच्या स्वाक्षरीने कॉंग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील ओबीसी विभागाच्या प्रभारी व सहप्रभारी पदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या कोअर कमिटी सदस्य असलेल्या मंगलताई भुजबळ यांची राष्ट्रीय कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाच्या सहप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्तीपत्र आज दिल्लीवरून प्रसिध्द करण्यात आले आहे.
मंगल भुजबळ ह्या 12 वर्षापासून कॉंग्रेस पक्षाचे काम करत आहेत. आजपर्यंत त्यांनी कॉंग्रेस पक्षात शहर, जिल्हा व प्रदेश पातळीवर काम केले आहे. तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्य प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्या काम पाहत आहेत. गेल्या 12 वर्षांत त्यांनी पक्षसंघटनेत धडाडीने काम केले आहे. याच कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांना राष्ट्रीय राजकारणात काम करण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.
भुजबळ यांच्या निवडीबद्दल कॉंग्रेसचे राष्ट्रीय ओबीसी अध्यक्ष अजय सिंग यादव, महाराष्ट्र कॉंग्रेस ओबीसी प्रभारी राहूल यादव,कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, कॉंग्रेस ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, माजी मंत्री अमित देशमुख,माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री विजय वड्डेट्टिवार, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री वर्षा गायकवाड, महिला प्रदेशअध्यक्ष संध्याताई सवालाखे सह आदींकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.