Leopard Care Center | कर्जत – जामखेड मतदारसंघात बिबट संगोपन केंद्र उभारा ; रोहित पवारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । Leopard Care Center । कर्जत – जामखेड मतदारसंघात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत आहे. या भागात बिबट्याचे हल्ले वाढू लागले आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतून होत आहे. परंतू असे असतानाच आता मतदारसंघात बिबट संगोपन केंद्र उभारण्याची मागणी होऊ लागली आहे.
कर्जत – जामखेड मतदारसंघात बिबट संगोपन केंद्र व्हावे यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनी यासंबंधीची मागणी केली आहे. रोहित पवार यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. (Establishment of Bibat Leopard Care Center in Karjat Jamkhed constituency; Rohit Pawar’s demand to Chief Minister Uddhav Thackeray)
ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझ्या मतदारसंघात ‘बिबट संगोपन केंद्र’ स्थापन करण्याचा आणि जैवविविधता प्रकल्पाबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना भेटून केली. याबाबत तातडीने सूचना दिल्या जातील,असं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. याबाबत त्यांचे आभार.
दुसर्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कर्जत – जामखेड मतदारसंघात बिबट्याचा वावर व हल्ले लक्षात घेता ‘बिबट संगोपन केंद्र’ सुरू करण्यासाठी तसंच जैवविविधता प्रकल्पाबाबत केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव यांना गेल्या महिन्यात दिल्लीत भेटलो असताना हे दोन्ही प्रस्ताव राज्य सरकारमार्फत पाठवण्याची सूचना त्यांनी केली होती.
दरम्यान कर्जत जामखेड मतदारसंघात बिबट संगोपन केंद्र व जैवविविधता प्रकल्पाबाबतचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच यासंबंधी निर्णय होऊन दोन्ही प्रकल्प मतदारसंघात होतील अशी शक्यता आहे. परंतू यासाठीच जोरदार पाठपुरावा करावा लागणार आहे.