सातबाऱ्यावरून जातीचा उल्लेख हद्दपार, अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यामध्ये पहिल्यांदा झाली अंमलबजावणी 

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । महसूल विभागाने सातबारा उताऱ्यावरील ‘शेतीचे स्थानिक नाव’ या रकान्यात जातीवाचक नावाचा उल्लेख न करण्याचा पुरोगामी निर्णय मागील वर्षी घेतला होता. या निर्णयाची अहमदनगर जिल्ह्यातील प्रथम अंमलबजावणी राहाता व नेवासा तालुक्यात करण्यात आली आहे.

राहातामधील बाभळेश्वर व नेवासा मधील रामडोह, गोपाळपूर, वरखेड,  माळेवाडी दुमला, सुरेगाव दहिगाव, गळनिंब व खामगाव या गावातील ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे या गावातील ७/१२ उताऱ्यावरील जातीची नावे आता हद्दपार होणार आहेत. या निर्णयाचे गावकऱ्यांनी स्वागत केले आहे.

समाजातील जाती-पातीच्या भिंती गळून सामाजिक सलोखा व सौहार्दपूर्ण वातावरण टिकून राहावे. यासाठी शासनाच्या महसूल विभागाने २५ ऑगस्ट २०२१ रोजी ७/१२ उताऱ्यातील ‘शेतीचे स्थानिक नाव’ या या रकान्यात नोंदवण्यात आलेल्या जातीवाचक नावाची नोंद कमी करून सुधारित नोंद घेण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केला होता. यात जातीच्या नावाऐवजी आवश्यक असल्यास गावातील स्थानिक-भौगोलिक स्थितीशी निगडित, नदी नाल्याची निगडित नावे देण्यात यावी. अशा सूचना देण्यात आल्या होत्या.

राहाता तालुक्यात ‘बाभळेश्वर’ ग्रामपंचायतीने ७/१२ उताऱ्यावर जातीच्या नावाचा उल्लेख न करण्याचा ठराव केला आहे. या ठरावानुसार बाभळेश्वर गावातील एका शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यावरील ‘शेतीचे स्थानिक नाव’ मधील ‘महारांचा गट नंबर’ हा उल्लेख हद्दपार करत ‘बनसोडे यांचा गट नंबर’ असा जातीविरहित नावाचा उल्लेख असलेला ७/१२ उतारा देण्यात आला आहे.

महसूल विभागाच्या या मोहिमेविषयी राहाता तहसीलदार कुंदन हिरे म्हणाले की,  “यापूर्वी शासनाने जातीवाचक वस्त्यांचे नावे बदलण्याचा पुरोगामी निर्णय घेतला होता. आता ७/१२ उताऱ्यावरील जातीचे नाव हद्दपार करण्याच्या निर्णयाने गावागावात सामाजिक वातावरण निकोप होण्यास मदत होणार आहे. यातून ॲट्राॅसिटी गुन्ह्यांच्या प्रमाणातही घट होण्यास मदत होणार आहे.”