बैल बाजारातील बेकायदेशीर वसुली बंद करा या मागणीसाठी शेतकरी संघटना झाली आक्रमक

कर्जत :  तालुक्यातील राशीन येथील जनावरांच्या आठवडे बाजारात सर्वसामान्य शेतकऱ्याची ग्रामपंचायतमार्फत होणारी बेकायदेशीर वसुली तात्काळ थांबवावी या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

बेकायदेशीर वसुली बंद न केल्यास शेतकरी संघटनाच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा लालासाहेब सुद्रीक यांनी दिला. या आशयाचे निवेदन सुद्रीक यांनी आ रोहित पवार यांना दिले आहे.

राशीन(ता.कर्जत) येथे मोठा जनावरांचा बाजार भरला जातो. या बाजारात मोठ्या प्रमाणात पशुधन खरेदी-विक्रीस आणले जाते. सदर ठिकाणी ग्रामपंचायत राशीन यांच्याकडून बेकायदेशीरपणे प्रत्येकी जनावरांच्या मागे ३० ते ४० रुपये वसुली करीत आहे. तालुक्यातील कोणत्याच ठिकाणी अशी सक्तीची वसुली केली जात नाही.

हायकोर्टाने आदेश देखील केला असून राशीन ग्रामपंचायत त्याची अंमलबजावणी करीत नसल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे लालासाहेब सुद्रीक प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. राशीन बाजारातील सदरची बेकायदेशीर वसुली तात्काळ बंद करावी अशी मागणी निवेदनाद्वारे आ रोहित पवार यांच्याकडे केली आहे.