जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातील प्रसिध्द भांड्याचे व्यापारी महेंद्र बोरा यांच्या कारला आष्टी तालुक्यातील पोखरी शिवारात भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी अहमदनगरला हलविण्यात आले आहे.या भीषण अपघाताच्या घटनेमुळे जामखेड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर असे की, जामखेड येथील व्यापारी महेंद्र बोरा हे गेल्या काही दिवसांपुर्वी राजस्थान जिल्ह्यात धार्मिक पर्यटनासाठी सहकुटुंब गेले होते. बोरा हे आपल्या चार चाकी वाहनातून राजस्थान येथून देवदर्शन घेऊन जामखेडला परतत होते. त्यानुसार ते पुण्याहून एम. एच.16 ए. टी 8807 या चारचाकी गाडीने आज जामखेडला येत असतानाच त्यांच्या गाडीला आष्टी तालुक्यातील पोखरी शिवारात सकाळी साठ आड वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला.
हा अपघात इतका भीषण होता की, भरधाव कार पुलावरून खाली कोसळली, या अपघात व्यापारी महेंद्र बोरा (वय 58 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी रेखा महेंद्र बोरा (वय 52), सुन जागृती भुषण बोरा (वय 28) नात लियाशा भुषण बोरा (वय 6) हे तिघे जण गंभीर जखमी झाले. जखमींवर जामखेडमधील एका खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगरला हलविण्यात आले आहे. मुलगा भुषण शांतिलाल बोरा वय 34 हा किरकोळ जखमी झाला आहे.भांड्यांचे व्यापारी महेंद्र बोरा यांच्या निधनामुळे जामखेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.