जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात खंडणी आणि खूनाचा प्रयत्न करणे हे गुन्हे दाखल झाल्यानंतर उद्योजक रमेश आजबे यांनी मुरुमकर यांच्याविरोधात खळबळजनक आरोप करत मोठी खळबळ उडवून दिली होती, त्यानंतर आता आठवडाभरानंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सदस्य असलेल्या जामखेड शहरातील एका चित्रपट कलावंताने पत्रकार परिषद घेत डाॅ भगवान मुरुमकर यांच्याबाबत नवा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे.
चित्रपट कलावंत संदिप शिंदे यांनी आज 5 रोजी जामखेड येथील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर यांच्यावर खंडणीचे आरोप केले.10 वर्षापुर्वी भगवान मुरुमकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी 10 लाखांची खंडणी मागितली होती, असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला.
मी यांचा खूप जुना शिकारी
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना संदिप शिंदे म्हणाले की, गेल्या आठवड्यात जामखेडमध्ये माजी पंचायत समिती सभापती डाॅ भगवान मुरुमकर व त्यांच्या टोळीने खंडणीसाठी अंदुरे कुटुंबियांवरती जो प्राणघातक हल्ला केला, तीच वेळ 2012 पासून मी भोगत आहे, मी यांचा खूप जुना शिकारी आहे. माझी व्यापाऱ्यांना आणि जामखेडच्या लोकांना एकच विनंती की, ह्या भगवान टोळीचे जे जे शिकार झाले आहेत, त्या सर्वांनी समोर यावे, सागर अंदुरे, शशिकांत अंदूरे, उमाकांत अंदुरे, यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झालाय त्या अंदुरे परिवाराला बळ द्यावे, असे अवाहन शिंदे यांनी केले.
चार दिवस मोकाट फिरत होते, तेव्हा….
संदिप शिंदे पुढे म्हणाले की, अंदुरे यांना मारहाण झाल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर साधारणता: चार दिवस शितल कलेक्शनच्या समोर भगवान मुरूमकर,भरत जगदाळे, आणि त्यांच्या टोळीतील इतर सदस्य चार दिवस मोकाट फिरत होते, तेव्हा जामखेड पोलिस प्रशासन काय करत होतं? असा सवाल करत शिंदे पुढे म्हणाले की, मला 2012 मध्ये भगवान मुरुमकरच्या टाटा सफारी क्रमांक 2000 मधून वारंवार येऊन त्रास द्यायचे.टाटा सफारी मधून येऊन मला पकडून पंचायत समितीमध्ये आणायचे, असा गौप्यस्फोट करत शिंदे यांनी खळबळ उडवून दिली.
दहा लाख दिल्याशिवाय तुमची सुट्टी नाही
शिंदे पुढे म्हणाले, टाटा सफारी मधून येऊन मला पकडून पंचायत समितीमध्ये आणायचे,त्यावेळेस तिथं भगवान मुरुमकर बसलेले असायचे, मला वारंवार खंडणीसाठी त्रास द्यायचे, आणि भगवान मुरुमकर त्याठिकाणी पंचायत समितीत गेल्यानंतर म्हणायचे की,तुम्ही दहा लाख दिल्याशिवाय तुमची सुट्टी नाही, तुम्ही एक महिन्यांमध्ये दहा लाख रूपये माझ्याकडे आणून देणे, अन्यथा जामखेडमध्ये तुमच्या ज्या ज्या जागा आहेत तिथे तुम्हाला पाय ठेवून देणार नाही, अशी धमकी मला दिली जायची असे शिंदे म्हणाले.
अशी वेळ दुसर्या व्यापाऱ्यावर कधीही येऊ नये
त्याचवेळी मी माझा आवाज उठवला असता तर आज सागर अंदुरे यांच्या कुटुंबांवरती जो अन्याय झाला आहे, तो झाला नसता, त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी स्वता:ला वाचवण्यासाठी एकत्रित यावे व अंदुरे कुटुंबियांच्या पाठीशी उभे रहावे, असे अवाहन करत शिंदे पुढे म्हणाले की, भगवान मुरुमकर व भरत जगदाळे यांच्या टोळीकडून सागर अंदुरे यांच्या कुटुंबांवर जो प्राणघातक हल्ला झालाय ही वेळ दुसर्या व्यापाऱ्यावर कधी येऊ नाही याची काळजी जामखेड पोलिस स्टेशनने घ्यावी, हि मी विनंती करतो, असे शिंदे म्हणाले.