जामखेड : अखेर सिंचन विहीरींची चौकशी थांबली, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व आमदार प्रा.राम शिंदे यांच्या मध्यस्थीला यश !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून मंजुर करण्यात आलेल्या वैयक्तीक लाभाच्या सिंचन विहीरींच्या फायली जिल्हा परिषदेने चौकशीसाठी मागवल्या होत्या. त्याबरोबर विहीरींचे कामे थांबवली होती. याप्रश्नी जामखेड तालुक्यातील रोजगार सेवकांनी मंगळवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व आमदार प्रा राम शिंदे यांची अहमदनगर येथे भेट घेतली व विहीरींबाबत खुलासा देत सत्य परिस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना महत्वपूर्ण निर्देश दिले.
जामखेड तालुक्यातील विहीरींचे कामे तत्काळ सुरु करावेत, गोर गरिब शेतकऱ्यांना त्रास होऊ नये. सदरची चौकशी थांबवून विहीरींच्या फायली डेप्युटी CEO मार्फत जामखेडला पोहच करा असे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना दिले. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्हा परिषदेने अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी, कर्जत व जामखेड या तीन तालुक्यातील सिंचन विहीरींबाबत चौकशी हाती घेतली आहे.परंतू यात राजकीय हस्तक्षेप झाला असल्यानेच ही चौकशी सुरु झाल्याचा आरोप होऊ लागला होता. जामखेड तालुक्यात भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडिया वाॅर रंगले होते. सिंचन विहीरींचा मुद्दा जामखेड तालुक्यात चांगलाच तापला होता.
महायुती सरकारच्या माध्यमांतून यंदा सर्वाधिक विहीरींचे कामे जामखेड तालुक्यात सुरु झाली आहेत. तालुक्यात तब्बल 3300 विहीरींचे प्रस्ताव मंजुर झाले होते. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. अश्यातच जिल्हा परिषदेने सिंचन विहीर प्रस्तावांची चौकशी हाती घेतली. चौकशी सुरु झाल्यामुळे सिंचन विहीरींचे कामे थांबवण्यात आली होती.यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती.
जामखेड तालुक्यातील सिंचन विहीरींचे प्रस्तावात कुठलीही गडबड नसून सर्व प्रस्ताव पारदर्शक पध्दतीने बनवण्यात आले आहेत असा दावा रोजगार सेवकांनी केला होता. सिंचन विहीरींचा मुद्दा चांगलाच तापल्याने जामखेड तालुक्यातील रोजगार सेवकांनी मंगळवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व आमदार प्रा.राम शिंदे यांची अहमदनगर येथे भेट घेतली. या भेटीत सिंचन विहीरींच्या प्रश्नांवर सर्व रोजगार सेवकांनी खुलासा देत सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात आल्याचे विखे पाटील व आमदार शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी रोजगार सेवकांच्या शिष्टमंडळासोबत रवींद्र सुरवसे, बापूराव ढवळे, सोमनाथ पाचारणे, शरद कारले, लहू शिंदे,अशोक महारनवर सह आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
जामखेड तालुक्यातील रोजगार सेवकांकडून वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर पालकमंत्र्यांनी सदरची चौकशी तत्काळ थांबवण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना दिले. त्याचबरोबर बुधवारपासून विहीरींचे सर्व कामे सुरु करावीत, जिल्हा परिषदेत मागवलेल्या फायली उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत तातडीने जामखेडला पाठवा असे आदेश दिले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व आमदार प्रा.राम शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या महत्वाच्या प्रश्नांत तातडीने लक्ष घालत सिंचन विहीरींची चौकशी थांबवल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील 3300 विहीरींची चौकशी थांबली आहे. सिंचन विहीरींच्या चौकशीवरून उठलेले वादळ शमवण्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व आमदार प्रा.राम शिंदे यांना यश आले आहे.