कर्जत : अखेर आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश, मिरजगावात होणार उपजिल्हा रुग्णालय, निविदा प्रक्रिया सुरु, 10 कोटी 56 लाखांचा निधी मंजूर!
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या जोरदार पाठपुराव्याला यश आले आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारने 10 कोटी 56 लाख रूपये खर्चाच्या 50 खाटांच्या मिरजगाव उपजिल्हा रुग्णालयाची ई-निविदा प्रक्रिया हाती घेतली आहे. आज अहमदनगर सार्वजनिक बांधकाम विभागाने ई निविदा प्रक्रियेबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्जत तालुक्यातील मिरजगाव हा भाग अहमदनगर- सोलापूर हायवेवर येत असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडत होत्या. याशिवाय या भागातील नागरिकांना सार्वजनिक आरोग्याच्या सुविधा मिळवण्यासाठी अहमदनगर किंवा कर्जत येथे उपचारासाठी जावे लागत असायचे. या भागात अद्यावत ट्रामा केअर सेंटर असावे अशी मागणी होती. आमदार प्रा.राम शिंदे हेही याबाबत आग्रही होते. परंतू ही मागणी तांत्रिक कारणाने मागे पडली. परंतू मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी केंद्र सरकारकडून 6 कोटींचा निधी मंजुर करुन आणण्यात आमदार प्रा.राम शिंदे यांना यश आले होते.
दरम्यान, मिरजगाव भागातील आरोग्याच्या समस्या दुर व्हाव्यात यासाठी आमदार प्रा.राम शिंदे सातत्याने प्रयत्न करत होते. मिरजगाव हे बाजारपेठेच्या दृष्टीने महत्वाचे शहर आहे. या भागात नेहमी नागरिकांची मोठी वर्दळ असते. या भागात सार्वजनिक आरोग्याची दर्जेदार सुविधा निर्माण व्हावी, सामान्य जनतेला शासनाच्या आरोग्य सेवेचा लाभ यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी मिरजगाव येथे उपजिल्हा रूग्णालय व्हावे यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा हाती घेतला होता. महायुती सरकारने आमदार प्रा.राम शिंदे यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करून मिरजगाव उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी दिली.
आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे 10 कोटी 56 लाख 61 हजार रूपये खर्चाच्या 50 खाटाच्या उपजिल्हा रूग्णालयाच्या इमारत बांधकामाची ई टेंडर प्रक्रिया महायुती सरकारने हाती घेतली आहे. आज 6 सप्टेंबर 2023 रोजी अहमदनगर सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत ई निविदा सुचना जारी केली आहे. यामुळे आता येत्या काही महिन्यांत मिरजगावमध्ये लवकरच अद्यावत असे सर्व सोईसुविधांयुक्त उपजिल्हा रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे. या रूग्णालयामध्ये या भागातील नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निघाली निघाला आहे.
मिरजगाव व परिसरातील अनेक गावांमधील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने मिरजगाव उपजिल्हा रुग्णालय अतिशय महत्वाचे ठरणार आहे. मिरजगाव शहराजवळून जाणाऱ्या नॅशनल हायवेवर सतत भीषण अपघात होतात.मोठी वैद्यकीय सुविधा नसल्याने अपघातग्रस्तांचा उपचाराअभावी दुर्दैवाने मृत्यू होतो. पण आता उपजिल्हा रूग्णालय मिरजगावात उभा राहत असल्याने अपघातग्रस्तांना तातडीची अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा व उपचार मिळणार आहेत. यामुळे अनेक रूग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल. मिरजगाव येथे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचा महायुती सरकारने निर्णय घेतल्याबद्दल मिरजगाव व परिसरातील जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
आपल्या भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी माझा नेहमी प्रयत्न असतो. कर्जत तालुक्यातील मिरजगाव भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचा मी शब्द दिला होता. तो पुर्ण करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाचा विषय हाती घेतला. सरकारकडे पाठपुरावा केला. महायुती सरकारने यासाठी 10 कोटी 56 लाखांचा निधी मंजूर केला.आता या रुग्णालयाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया सुरु झाली आहे. मिरजगाव भागातील जनतेचे स्वप्न या निमित्ताने पुर्ण होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत व महायुती सरकारचे मनापासून आभार !