अहमदनगर जिल्हा रूग्णालयात अग्नीतांडव : 11 जणांचा मृत्यू ! 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्हा आज एका दुर्दैवी घटनेने हादरला आहे. जिल्हा रुग्णालयातील ICU करोना कक्षाला आज सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली. या अग्नीतांडवात अत्तापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण 60 ते 70 वयोगटातील आहेत. (Fire kills 11 at Ahmednagar district hospital)

आयसीयू कक्षामध्ये 25 जणांवर करोनाचे उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान या कक्षाला सकाळी आग लागली आणि या आगीमध्ये हे सर्व रुग्ण गंभीररिय्या भाजले. आगीमुळे ICU कक्ष जळून खाक झाला आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.

हिवरे बाजारचे सरपंच तथा पद्मश्री पोपटराव पवार हे उद्या दिल्लीला जाणार असल्याने कोरणा टेस्ट करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आले होते. ते बाहेर उभे असतानाच कक्षाला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोकरणा हेही त्यांच्या दालनामध्ये होते. पोपटराव पवार यांना ही आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी सर्व यंत्रणांना तातडीने फोन केले. पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ,  जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, महापालिकेचे आयुक्त यांच्यासह सर्व यंत्रणांना तातडीने फोन केले व यंत्रणा हलवली.

त्यामुळे अग्निशमन दल,  जिल्हाधिकारी कार्यालयाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा महापालिकेची यंत्रणा यांनी तातडीने घटनास्थळी  धाव घेतली आणि आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

आयसीयूमध्ये  भाजलेल्या अवस्थेत असलेल्या रूग्णांना तातडीने इतर कक्षात हलवण्यात आले आणि ऑक्सिजन व्हेंटिलेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली मात्र त्यातील काही रुग्ण अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दुपारी एक पर्यंत या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.