रोहित पवारांसोबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी घेतली वनविभागाची बैठक, कर्जत-जामखेडमधील प्रश्नांवर लवकरच तोडगा निघणार – आमदार रोहित पवार
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत जामखेड मतदारसंघातील अनेक कामांना सरकारने दिलेली स्थगिती उठवावी तसेेच अडलेली कामे वेगाने सुरू व्हावीत, यासाठी आमदार रोहित पवार यांनी मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावला आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी नुकतीच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत मतदारसंघातील अनेक प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले.
वन विभागाच्या अडचणीमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेेत. या कामांना गती मिळावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी वनविभागाची बैठक घेण्याची मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार नुकतीच मुंबईत वनविभागाची बैठक झाली. या बैठकीला आमदार रोहित पवार यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कर्जत आणि अरणगाव (जामखेड) येथे जैवविविधता उद्यान, बिबट संगोपन केंद्राची स्थापन अशी वनविभागाशी संबंधित अनेक कामे प्रलंबित आहेत. शिवाय कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी ते चखालेवाडी गट नं. ६० मधून जाणारा रस्ता, अळसुंदे ते देमनवाडी गट नं. ४७८ व ४९३ मधून जाणारा रस्ता, नांदगाव ते राक्षसवाडी रस्ता तसेच जामखेड तालुक्यातील देवदैठण व साकत या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे अडली आहेत. याकडे पवार यांनी वनमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
यावेळी वन विभागामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील अडकलेल्या विकास कामांना गती देण्याबाबत चर्चा झाली. तसेच कर्जतच्या जैवविविधता उद्यानाचे सुमारे पन्नास टक्के काम झाले असून पुढील निधी सरकारने स्थगित केल्याने हे काम थांबले आहे. ते पूर्ण करण्यासाठी अधिकचा निधी देण्याची मागणी यावेळी आमदार रोहित पवार यांनी बैठकीत केली.
‘‘वनविभागाशी संबंधित अडचणींमुळे मतदारसंघातील रस्त्यांसह अनेक विकास कामं अडकली आहेत. याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारकडं माझा नियमित पाठपुरावा सुरु आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे झालेल्या बैठकीत या विषयांवर सविस्तर चर्चा झाली आहे. मंत्रिमहोदयही याबाबत सकारात्मक असल्याने पुढील काळात या अडचणी सुटतील, अशी अपेक्षा आहे.’’ अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.