जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। लिहणे आणि बोलण्याचे स्वातंत्र्य राज्य घटनेच्या कलम 19 नुसार प्रत्येक भारतीय व्यक्तीला आहे. हा मुलभूत अधिकार कोणालाही डावलता येत नाही. जर हा अधिकार कोणी डावलला तर कलम 35 नुसार त्याच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य सुध्दा कलम 19 मध्ये अंतर्भूत आहे. हा मुलभूत अधिकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सर्व भारतीय नागरिकांना मिळाला आहे, प्रसारमाध्यम हे पूर्वीपासूनच जाणिव जागृती करण्याचे महत्वाचे माध्यम राहिलेलं आहे,असे प्रतिपादन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले.
पत्रकार दिनानिमित्त जामखेड पंचायत समितीकडून आज 9 रोजी पत्रकारांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ हे होते. यावेळी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर, कृषी अधिकारी अशोक शेळके, गटशिक्षण अधिकारी कैलास खैरे, विस्तार अधिकारी बापूराव माने, सुनिल मिसाळ, भजनावळे सह आदी उपस्थित होते.
यावेळी जामखेड पंचायत समितीच्या वतीने जामखेड मीडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, जामखेड मीडिया क्लबचे सचिव सत्तार शेख, अविनाश बोधले, दत्ता राऊत, फय्याकभाई सय्यद, संजय वारभोग,किरण रेडे, पप्पुभाई सय्यद, अजय अवसरे, रोहित राजगुरू, संतोष गर्जे, खर्डा प्रेस क्लबचे उपाध्यक्ष तुळशीदास गोपाळघरे, जामखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपक देवमाने, ओंकार दळवी, जामखेड पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अशोक निमोणकर, लियाकत शेख, संदेश हजारे, मिठूलाल नवलाखा, बाळासाहेब वराट, समीर शेख, बाळासाहेब शिंदे, दत्तराज पवार, किशोर दुशी, यासीन शेख, डाॅ प्रकाश खंडागळे, किरण शिंदे,आशुतोष गायकवाड, सुजीत धनवे सह आदी पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी अनेक पत्रकारांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी पुढे बोलताना गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळातील सर्वच नेते हे संपादक आणि पत्रकार होते. ते लेख लिहायचे, अग्रलेख लिहायचे, समाजात ब्रिटिशांविरुद्ध जाणीव जागृती निर्माण करण्याचे काम हे नेते वर्तमानपत्रातून करत होते. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनीसुध्दा स्वातंत्र्यपुर्व काळात दर्पण वर्तमानपत्राच्या माध्यमांतून मराठी पत्रकारितेचे पायाभरणी केली. त्यांनी केलेले कार्य आजच्या आधुनिक पत्रकारितेतही दिशादर्शक आणि प्रेरणादायक आहे.
यावेळी पोळ पुढे म्हणाले की, ग्रामविकास विभागाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे पत्रकार हे होय. जामखेड तालुक्यातील पत्रकारांनी माझ्या दीड वर्षाच्या कार्यकाळात आम्ही राबवत असलेल्या उपक्रमांना सकारात्मक प्रसिध्दी दिल्यामुळे जामखेड तालुका घरकुल असेल अथवा MREGS असेल या महत्वाच्या योजना राबवण्यामध्ये प्रथम क्रमांकांवर आला आहे. समाजात डाॅक्टर, पत्रकार आणि वकिल हे तीन घटक खूप महत्वाचे आहेत.2001 पासून माझा वर्तमानपत्राशी संबंध आला. तेव्हापासून मी विविध दैनिकांत वेगवेगळ्या विषयांवर लेख लिहले आहेत, असे सांगत गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी त्यांनी केलेल्या पत्रकारितेच्या आठवणी जागवल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर कोळेकर यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी बापूराव माने यांनी मानले.