विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! जामखेडच्या रत्नदीप संस्थेला एम.फार्मसी अभ्यासक्रम सुरु करण्यास मिळाली मंजुरी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर या संस्थेस एम.फार्मसी हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पाच विषयांत सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे.फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली व महाराष्ट्र तंत्र व उच्च शिक्षण विभाग यांच्या वतीने ही मंजुरी देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांनी दिली आहे.
जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील रत्नदीप शैक्षणिक संकुलात बीएएमएस आयुर्वेद, बीएचएमएस होमिओपॅथिक, बी.एस्सी नर्सिंग, एएनएम व जीएनएम या कोर्सचे स्वतंत्र काॅलेज कार्यरत आहेत.काॅलेजमध्ये नर्सिंग पदविका अभ्यासक्रम देखील सुरू आहे. त्यांची प्रवेश प्रक्रिया कॉलेज स्तरावर राबविण्यात येते. शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यामार्फत चालु शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती प्रवेश समन्वयक रविंद्र ढवळे व प्रशांत राळेभात यांनी दिली.
जागतिक स्तरावर फार्मसी क्षेत्रात असलेल्या संधी पाहता जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांचा फार्मसी कडे कल वाढतो आहे. रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलात एम. फार्मसी हा अभ्यासक्रम सुरू होत असल्याने त्याचा ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना फायदा होणार आहे, अशी माहिती रत्नदीप फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुग्रिव घोडके यांनी दिली.
रत्नदीप शैक्षणिक संकुलात एम फार्मसी अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी मिळाल्याने परीसरातील विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण झाल्या आहेत, याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे अवाहन रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय पोपळे यांनी केले आहे.