..अन पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचारी हातात झाडू घेऊन उतरले रस्त्यावर

गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या टीमने केली खर्डा शहरात स्वच्छता

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) : कोणत्याही संघाचा कर्णधार जर कृतिशील असेल, तर तो संघ मोठ्या ऊर्जेने मैदानात उतरून मैदान गाजवण्याची ताकद ठेवतो. हीच एकजुटीची ताकद नवनिर्माणाच्या कार्याला पुढे जाणारी ठरत असते. असेच काहीसे दृश्य शनिवारी जामखेड तालुक्यातील खर्डा या शहरात पहायला मिळाले. (Group Development Officer Prakash Pol’s team cleaned Kharda city)

कुठल्याही विभागात सामाजिक भान असलेला अधिकारी असला की, त्या अधिकाऱ्याच्या हातून नवनवीन उपक्रमाला जन्म घातला जातो. शिवाय त्या उपक्रमाची नुसत्या आदेशावर कृतिशील अंमलबजावणी न करता थेट मैदानात उतरून जेव्हा होते तेव्हा संपूर्ण विभागाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन पार बदलून जात असतो त्याच दृष्टिकोनातून पंचायत समितीचे नवे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या नेतृत्वाखाली जामखेड पंचायत समितीने शनिवारी मोठे पाऊल उचलले.

सध्या जामखेड तालुक्यात भगव्या स्वराज्य ध्वजाची यात्रा विविध गावांमध्ये जात आहे. गावोगावी उत्साहाचे वातावरण आहे. याशिवाय तालुक्यात माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत.

15 ऑक्टोबर रोजी भारतातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज खर्डा किल्ला परिसरावर बसवला जाणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. किल्ला परिसर व खर्डा शहरात मोठ्या जोमाने स्वच्छता मोहिमे राबवली जात आहे. या मोहिमेत शनिवारी जामखेड पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचारी व ग्रामसेवकांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता केली. तब्बल साडे तीन तास पंचायत समितीचे अधिकारी हातात झाडू घेऊन स्वच्छता करत होते. अधिकारी पदाचा बडेजाव बाजूला ठेऊन अतिशय उत्साहात अधिकारी व कर्मचारी स्वच्छता करत होते.

साडे तीन तास सुरु होती स्वच्छता

जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या नेतृत्वाखालील टिमने शनिवारी सकाळी आठ वाजता खर्डा शहरात धडक मारली. आठ वाजल्यापासून खर्डा बसस्थानक परिसर, खर्डा किल्ला परिसर या भागात साडे अकरा वाजेपर्यंत ही स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.  खर्डा शहरात स्वच्छतेसंदर्भात जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या उपक्रमात गावातील महिलांचा उस्फुर्त सहभाग होता.आजच्या स्वच्छता  मोहिमे मध्ये वार्ड क्रमांक तीन मधील  महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

स्वच्छता मोहिमेत यांनी घेतला सहभाग

जामखेड पंचायत समितीचे  गटविकास अधिकारी प्रकाश पोळ सहाय्यक गटविकास अधिकारी दयानंद पवार, तालुका कृषी अधिकारी अशोक शेळके, विस्तार अधिकारी बापूसाहेब माने,साळवे साहेब, कैलास खैरे,भजनावळे सह आदी अधिकारी सहभागी झाले होते.

या मोहिमेत ग्रामसेवकांचा सहभाग

खर्डा येथे पार पडलेल्या स्वच्छता मोहिमेत ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, ग्रामसेवक युवराज पाटील सह आदी ग्रामसेवकांनी सहभाग घेतला होता.