बंदुकीचा खटका दाबला.. आवाज आला..पण गोळी बंदुकीतच अडकली अन् पारनेरमध्ये मोठा अनर्थ टळला.. नगरसेवक युवराज पठारेंसोबत नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर

Yovraj Pathare Parner Ahmednagar News : राज्यात गेल्या पंधरा दिवसांत राजकीय नेत्यांवर गोळीबार करण्याच्या घटना घडल्या आहेत. यात दोघा नगरसेवकांची हत्या करण्यात आली आहे.राज्यातील गोळीबाराच्या घटना ताज्या असताना अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत शिवसेनेच्या नगरसेवकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. बंदुकीचा खटका दाबला खरा पण सुदैवाने बंदुकीत गोळी अडकल्याने शिवसेना नगरसेवक या प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

gun clicked there was sound  but bullet got stuck in gun and major disaster was averted in Parner, What exactly happened with corporator Yuvraj Pathare? Read in detail,

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील शिवसेना नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर भरदिवसा गावठी कट्यातून गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. या प्राणघातक हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. रांजणगाव मशिद येथील एका अल्पवयीन आरोपीने त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. पठारे यांच्यावर का हल्ला करण्यात आला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पठारे यांच्यावरील हल्ल्यानंतर पारनेरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ पारनेरमध्ये आज बंद पाळण्यात येत आहे. पारनेर पोलिसांनी घटनास्थळाहून गावठी कट्टा ताब्यात घेत वेगाने तपास हाती घेतला आहे.

पारनेरमध्ये भर सकाळी नेमकं काय घडलं ?

पारनेर बसस्थानक परिसरात नगरसेवक युवराज पठारे यांच्या मालकीचे हाॅटेल दिग्विजय आहे. ते रोज सकाळी या ठिकाणी येत असतात. नेहमीप्रमाणे नगरसेवक युवराज पठारे हे आपल्या सहकाऱ्यांसह गुरुवारी सकाळी हाॅटेल दिग्विजयमध्ये आले होते. ते हाॅटेलमध्ये येण्याआधी काही तरूण तिथे येऊन बसले होते. त्यातील एका तरूणाने पठारे हे हाॅटेलमध्ये आल्यानंतर त्यांच्या छातीवर गावठी कट्टा लावत गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्याने बंदुकीचा खटका ओढली.. गोळीबाराचा आवाज झाला पण बंदुक चालली नाही.. सुदैवाने पठारे हे या प्राणघातक हल्ल्यातून बचावले. अचानक घडलेल्या या घटनेनंतर पठारे यांचे सहकारी भरत गट यांनी हल्लेखोरावर झडप घालत त्याच्या हातून गावठी कट्टा हिसकावून घेतला आणि मोठा अनर्थ टळला. ही घटना गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

युवराज पठारे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी रांजणगाव मस्जिद येथील अल्पवयीन तरुण असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीसोबत असलेले दोघेजण तिथून पळून गेले. उपस्थितांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांकडे दिलं आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत असून या हल्ल्यामागचं कारण काय? कोणाच्या सांगण्यावरून त्याने हल्ला केला ? याचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक समीर बारवकर हे करत आहेत.

फिर्यादीत काय म्हटले आहे ?

पारनेर बस स्थानक परिसरात पठारे यांचे यशवंत नावाचे हाॅटेल आहे. ते याठिकाणी दररोज बसतात. काही वेळा ते वडनेर हवेलीचे सरपंच लहू भालेकर यांच्या हाॅटेलसमोर बसतात. हाॅटेल दिग्विजय समोर नगरसेवक युवराज पठारे हे बाप्पा भालेकर व सतिश पिंपरकर यांच्यासह हाॅटेलमध्ये गप्पा मारत बसले होते. त्याचवेळी आरोपीने गोळीबाराचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने पठारे यांच्यावर चॉपरने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. त्यानंतर आरोपीला पकडण्यात आले. त्याच्याकडे पठारे यांनी विचारणा केली असता गणेश कावरे व संग्राम कावरे यांनी मारायला पाठवले असल्याचे सांगितले. घटनेनंतर पठारे हे फिर्याद देण्यास पोलिस ठाण्यात निघाले असता गणेश कावरे याने पठारे यांना फोन करून सांगितले की, तु आता वाचला आहेस, तु पोलिस स्टेशनला गेलास तर तुला संपवल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी दिली असे युवराज पठारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल

पारनेर पोलिस स्टेशनला युवराज पठारे हल्ला प्रकरणी गणेश कावरे, संग्राम कावरे, यश बाळू जाधव,  महेश खेडेकर, ओमकार मुळे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील यश बाळू जाधव,  महेश खेडेकर, ओमकार मुळे यांना अटक करण्यात आली आहे. तर गणेश कावरे व संग्राम कावरे हे दोघे फरार आहेत. त्यांचा पोलिस कसून शोध घेत आहेत.

आज पारनेर बंद

शिवसेना नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याच्या निषेधार्थ आज पारनेर बंदची हाक देण्यात आली आहे. या घटनेतील आरोपी हा अल्पवयीन असून तो पारनेर महाविद्यालयात शिकत आहे. त्याच्याकडे गावठी कट्टा कोणी दिला याचाही तपास पोलिस करत आहेत.

युवराज पठारे कोण आहेत ?

युवराज पठारे हे पारनेर नगरपंचायतचे शिवसेनेचे नगरसेवक आहेत.पठारे पारनेर तालुका तालिम संघाचे अध्यक्ष आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ते नगरसेवक आहेत. अहमदनगर जिल्ह्यात त्यांना विखे समर्थक म्हणून ओळखले जाते.