Halgaon Society Election Results 2022 ।जेष्ठ नेते किसनराव ढवळे यांनी गड राखला, हळगाव सोसायटी निवडणुकीत सत्ताधारी गटाकडून विरोधी गटाचा धुव्वा !
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड तालुक्याच्या राजकारणात महत्वाच्या असलेल्या हळगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी किसनराव ढवळे गटाने विरोधकांचा पुन्हा एकदा धुव्वा उडवत पराभवाची धूळ चारली.या निवडणुकीत जेष्ठ नेते किसनराव ढवळे यांनी पुन्हा एकदा आपला गड राखला. ढवळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्वच्या सर्व 13 जागा जिंकून धडाकेबाज विजय संपादन केला. (Halgaon Society Election Results 2022)
हळगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेवर जेष्ठ नेते किसनराव ढवळे यांच्या गटाची गेल्या 25 वर्षांपासून सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत राजकीय चमत्कार होणार अशी चर्चा रंगली होती. हळगाव सोसायटीच्या निवडणुकीत जेष्ठ नेते किसनराव ढवळे यांच्या राजकीय वर्चस्वाला हादरा देण्यासाठी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे यांनी कंबर कसली होती. पाचरणे यांच्या सोबत गावातील अनेक दिग्गज एकत्र आले होते.परंतू निकालात किसनराव ढवळे यांच्या गटाने बाजी मारली.
यंदा पार पडलेल्या सोसायटीच्या निवडणुकीत जेष्ठ नेते किसनराव ढवळे यांच्या ताब्यातून सोसायटी हिसकावुन घेण्यासाठी कंबर कसलेल्या विरोधी गटाने प्रचारात अनेक मुद्दे उपस्थित करत सभासदांना साद घातली होती. विरोधकांनी प्रचाराचा धुराळा उडवत मोठी रंगत आणली. या निवडणुकीत काट्याची टक्कर रंगली होती. आज 5 मार्च रोजी समोर आलेल्या निकालातून किसनराव ढवळे यांच्या गटाचे काही अंशी मताधिक्य घटल्याचे दिसून आले. विरोधकांना जेष्ठ नेते किसनराव ढवळे यांचे वोटबँक फोडण्यात अपयश आले. परंतू यंदाच्या निवडणुकीतून विरोधी गटाने आणलेली रंगत चर्चेची ठरली आहे.
हळगाव सेवा संस्थेच्या 13 जागांसाठी शनिवार दिनांक 5 मार्च रोजी निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी 966 मतदार पात्र होते. 966 पैकी 903 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीचा निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर झाला. या निकालात जेष्ठ नेते किसनराव ढवळे यांच्या गटाने सर्वच्या सर्व 13 जागांवर मोठ्या फरकाने धडाकेबाज विजय संपादीत केला.हळगाव सोसायटी निवडणुकीत सत्ताधारी गटाकडून विरोधक चारीमुंड्या चीत झाले.
हळगाव सोसायटीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये नारायण करगळ या उमेदवाराने सर्वाधिक मते घेतली. 507 मते घेऊन करगळ विजयी झाले. तर सर्वात कमी मते केरबा वाघमोडे या उमेदवाराला मिळाले. 466 मते घेऊन वाघमोडे विजयी झाले.
हळगाव सोसायटीची निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर यांनी काम पाहिले. निलेश मुंडे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी होते. त्यांना हळगाव सोसायटीचे सचिव दत्तात्रय चौरे यांनी सहकार्य केले. निवडणुकीच्या निकालासाठी तब्बल 30 जणांची टीम नियुक्त करण्यात आली होती. या टीमने निवडणूक निर्णय अधिकारी देविदास घोडेचोर यांच्या मार्गदर्शनाखाली कुठलाही गोंधळ न होता मतमोजणी पार पाडली.
निवडणुकीच्या मतदान आणि निकालावेळी कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजु थोरात, पीएसआय अनिल भारती, हेड कॉन्स्टेबल शिवाजी भोस, संजय लोखंडे, पोलिस काँस्टेबल नवनाथ शेकडे, ज्ञानेश्वर बेलेकर, अरूण पवार, संदिप राऊतसह आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान निकालानंतर विजयी उमेदवारांसह समर्थकांनी ढोल ताश्यांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला. विजयानंतर पॅनलप्रमुख जेष्ठ नेते किसनराव ढवळे यांचे चिरंजीव डाॅ संजय ढवळे यांनी सर्व मतदारांचे आभार मानले.
विजयी उमेदवार खालील प्रमाणे (Halgaon Society Election Winning Candidate List)
1) किसनराव दगडू ढवळे (मिळालेली मते – 495)
2) पाराजी हौसराव कापसे (मिळालेली मते – 491)
3) धनंजय बाबा ढवळे (मिळालेली मते – 478)
4) बाबासाहेब भिमराव पुराणे (मिळालेली मते – 475)
5) अंकुश खिवराज ढवळे (मिळालेली मते – 474)
6) बबन जयवंता ढवळे (मिळालेली मते – 470)
7) रविंद्र सोमनाथ कापसे (मिळालेली मते – 466)
8) केरबा पाराजी वाघमोडे (मिळालेली मते – 447)
9) सुरेखा सुदाम लेकुरवाळे (मिळालेली मते – 482)
10) मंकाबाई बापू कापसे (मिळालेली मते – 475)
11) रूपाली संजय ढवळे (मिळालेली मते – 503)
12) नारायण जानकू करगळ (मिळालेली मते – 507)
13) जगन्नाथ बंडू मंडलिक (मिळालेली मते – 461)