Heavy rains in Balaghat saved Jamkhed Taluka | बालाघाटातील दमदार पावसाने जामखेडला तारले;अनेक तलाव भरले !

दुष्काळात तहान भागवणारा मोहरी तलाव ओव्हर फ्लो

Heavy rains in Balaghat saved Jamkhed Taluka | जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात यंदाही पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नाही. मागील दोन महिने पावसाने दडी मारल्याने तालुक्यावर पुन्हा दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट घोंघावू लागले होते. मात्र मागील दोन तीन दिवसांत बालाघाटात धो धो पाऊस पडल्याने तालुक्याला मोठा फायदा झाला आहे. बालाघाटातून वाहणाऱ्या नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत.यावर अवलंबून असलेले बहुतांश मोठे तलाव आता भरू लागले आहेत. यामुळे बळीराजा सुखावला आहे.

जामखेड तालुक्यात यंदाही पावसाने कमी हजेरी लावली आहे. पावसाने दडी मारल्याने अनेक भागातील खरिप पिके करपून गेली. यंदा खरिप हंगाम तोट्यात गेला आहे. काही दिवसांपासून पावसाचे पुन्हा पुनरागमन झाले खरे परंतू तो तालुक्याच्या सर्व भागात दमदार बरसला नाही. बहुतांश भागात मुरपाऊस झाला आहे. यामुळे तुरी सारख्या खरिप पिकांना जीवनदान मिळाले. पण मोठ्या पावसाची प्रतीक्षा अजुनही तालुक्याला आहे. असे जरी एकीकडे चित्र असले तरी मागील दोन तीन दिवसात जामखेड तालुक्याचे चित्र बदलले आहे. जामखेड – बीड जिल्हा सरहद्दीवरील बालाघाट डोंगररांगेत पावसाने धो धो हजेरी लावल्याने या भागातून वाहणाऱ्या विंचरणा, मांजरा, खैरी व अन्य नद्या आता वाहत्या झाल्या आहेत. पाऊस बीडला फायदा जामखेडला असे चित्र निर्माण झाले आहे. (Heavy rains in Balaghat saved Jamkhed Taluka)

Heavy rains in Balaghat saved Jamkhed Taluka
रत्नापूर तलाव ओव्हर फ्लो

बीड जिल्ह्यातील सौताडा भागात झालेल्या दमदार पावसामुळे विंचरणा नदीवरील जामखेड शहराला पाणी पुरवठा करणारा भूतवडा (जूना) व भूतवडा जोड तलाव तसेच रत्नापुर तलाव ओव्हर झाले आहे.  यामुळे जामखेड शहराचा पाणी प्रश्न सुटला आहे. तसेच या तीनही तलावावर अवलंबून असलेल्या हजारो हेक्टर शेतीच्या पाण्याचा प्रश्नही सुटला आहे. सध्या विंचरणा नदी अशीच वाहती राहिल्यास नदीवरील कोल्हापुरी पध्दतीचे बंधारेही लवकरच भरले जातील. विंचरणा नदीकाठच्या गावांचा पाण्याचा प्रश्न यामुळे निकाली निघेल. (Heavy rains in Balaghat saved Jamkhed Taluka)

तर दुसरीकडे ज्या तलावाने भीषण दुष्काळात जामखेड तालुक्यातील अनेक गावांची तहान भागवली होती तो मोहरीचा तलावही आज ०६ रोजी ओसांडून भरला आहे. जातेगाव घाट परिसर तसेच पाटोदा तालुक्याचा भागात झालेला पाऊस मोहरी तलावासाठी फायदेशीर ठरला आहे. मोहरी तलाव भरल्याने खर्डा शहरासह मोहरी, गवळवाडी, गितेवाडी या गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे.

Heavy rains in Balaghat saved Jamkhed Taluka
मोहरी तलाव भरला

खर्डा शहरासह मोहरी, गितेवाडी, गवळवाडी, तेलंगशी, जायभायवाडी या गावाला ही पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीलाही सिंचनासाठी पाणीपुरवठा होतो. यामुळे तलावावर अवलंबून असणारे अंदाजे तीनशे ते चारशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांबरोबर वन्यजीव, पशु-पक्षी ,पाळीव प्राण्यांना होईल. मोहरी लघु प्रकल्प ६२.५० दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असून कालव्याची लांबी सात किलोमीटर आहे. या अंतर्गत येणारे शेतकरी डोंगर रांगातील वन्यजीवसह पशु, पक्षी, पाळीव प्राणी, शेतकऱ्यांना मोहरी तलाव संजीवनी ठरतो. (Heavy rains in Balaghat saved Jamkhed Taluka)

बालाघाटाच्या कुशीतील नायगाव तलावही शंभर टक्के भरला  आहे. नायगाव व मोहरी हे दोन तलाव भरल्याने आता या भागातील पाणी जामखेड तालुक्यात सर्वात मोठा मध्यम प्रकल्प असलेल्या खैरी प्रकल्पात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  सध्या खैरी 14 टक्के उपयुक्त पाणी साठा आहे.  तेलंगशी तलावात 90 टक्के पाणीसाठा झाला आहे.(Heavy rains in Balaghat saved Jamkhed Taluka )

धोंडपारगाव, जवळके, अमृतलिंग या प्रकल्पात शुन्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. तर धोतरी तलावात  35 टक्के पाणीसाठा आहे. यासह तालुक्यातील बहुतांश छोटे तलाव अजुनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान आष्टी व नगर  तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे सिना नदी वाहती झाली आहे. अजुन काही दिवस असाच दमदार पाऊस वरच्या भागात होत राहिल्यास सीना काठच्या गावांचाही पाणी प्रश्न सुटेल.पाटोदा परिसरात दमदार पाऊस झाल्याने दिघोळ जातेगाव भागातून वाहणाऱ्या मांजरा नदीला गेल्या आठवडय़ात मोठा पुर आला होता. सध्या नदी वाहते आहे.

तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणलोटक्षेत्रात दमदार पाऊस होऊन नद्या वाहत्या झाल्या त्यामुळे अनेक तलाव भरले असे आनंदायी चित्र असले तरी तालुक्यातील अनेक गावांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. रब्बी हंगामासाठी अजुन दमदार पाऊस व्हावा अशीच प्रार्थना बळीराजा करताना दिसत आहे.

 

 

web title: heavy rains in balaghat saved jamkhed taluka