Heavy rain in Pune । पुण्यात पावसाचा धुमाकूळ, चोहीकडे पाणीच पाणी, अनेक भाग जलमय, अनेक घरात पाणी शिरले
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । आज पुण्यात पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. शहर व परिसरात पावसाने जोरदार बॅटींग केल्याने पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या तासांपासून पुण्यात मुसळधार पाऊस पडत आहे. शहर व परिसरातील रस्ते जलमय झाले आहेत. तर अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले आहे. मुसळधार पावसामुळे वाहन धारकांचे प्रचंड हाल झाले.
पुण्यात रविवारी सकाळपासूनच पावसाने मोठा जोर पकडला आहे. विजांच्या कडकडाटासह दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागासह सर्वच रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शहरासह जिल्ह्यातही पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप आले आहे. पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये रविवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला आहे.
पुण्यातील मुसळधार पावसामुळे चंदननगर पोलीस स्टेशन, वेदनभवन, वनाज जवळ कचरा डेपो, लमाण तांडा, सोमेश्वर वाडी,वानवडी, शितल पेट्रोल पंप , बी टी ईवडे रोड, कात्रज उद्यान या भागात पाणी साचले आहे. तर झाडपडी भागात एनसीएल जवळ पाषाण, साळुंखे विहार, ज्योती हॉटेल , चव्हाणनगर, रुबी हॉलजवळील भागातही पाणी साचले आहे. तसेच लोहगाव परिसरातील अनेक सोसायट्या जलमय झाल्या आहेत.
पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट दाखविण्यात आल्याने रात्रीच्या अंधारात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे कामाव्यतिरिक्त बाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.