Ashadhi Wari 2023 : आषाढी वारीत हिंदू – मुस्लीम भाईचार्याचे दर्शन,मुस्लीम बांधवांनी केली वारकरी बांधवांची सेवा, शीरखुर्मा, सरबत, फळांचे ठिकठिकाणी वाटप !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Ashadhi Wari 2023 : आषाढी वारीसाठी राज्यातील लाखो वारकरी बांधव वेगवेगळ्या पायी दिंड्यांच्या माध्यमांतून पंढरीच्या वाटेवर आहेत. विठूनामाचा जयघोष करत, भगव्या पताका खांद्यावर घेत, वारकरी विठ्ठल भक्तीत दंग झाले आहेत. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण आहे. जगदगुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात लाखो वैष्णव सहभागी झाले आहे. तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात हिंदू – मुस्लीम भाईचार्याचे दर्शन घडले आहे. ही घटना इंदापूर तालुक्यातून समोर आली आहे.
तुकोबारायांचा पालखी सोहळा इंदापूरमध्ये आला होता. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, याप्रमाणे कुठलाही भेदाभेद न मानता आलेल्या वैष्णवांना गोडधोड खाऊ घालणे, हीच आपली परंपरा असल्याचं येथील मुस्लीम बांधवांची भावना आहे. पांडुरंगाची सेवा घडावी व जातीभेद नष्ट व्हावा म्हणून मुस्लिम समाजाच्या वतीने आम्ही हा उपक्रम मागील अनेक वर्षापासून राबवत असल्याचे यावेळी मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व युवक संघटनेकडून सांगण्यात आले. वैष्णवांनी देखील रांगा लावून या शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या वाटेवर असलेला जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज महाराजांचा पालखी सोहळा (Sant Tukaram Maharaj Palkhi sohala 2023) आज इंदापूर तालुक्यात दाखल झाला. इंदापूरमधील निमगाव केतकीत इथं पालखी सोहळा दाखल झाल्यानंतर इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व युवक संघटनेनं वारकऱ्यांना एक सुखद धक्का दिला.मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व युवक संघटनेच्यावतीने वारकऱ्यांना शीरखुर्माचं वाटप करण्यात आलं. या कृतीमधून हिंदू-मुस्लीम ऐक्याचं अनोखं दर्शन वारीमध्ये घडल्याचं पहायला मिळालं.
महाराष्ट्रातील वारकरी पांडुरंगाच्या भेटीला निघाले आहे. संपुर्ण महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण आहे. उन्हातान्हात विठूरायाच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांची महाराष्ट्रातील मुस्लिम बांधव ठिकठिकाणी सेवा करताना दिसत आहे. अनेक ठिकाणी मुस्लीम बांधवांकडून पिण्याच्या पाण्याची, नाश्ता, चहा बिस्कीटे, फळे, जेवणाची व्यवस्था करून वारकऱ्यांची सेवा केली जात आहे.समतेचा संदेश देणारी वारी दरवर्षीप्रमाणेच यंदाही महाराष्ट्रात पहायला मिळत आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव येथील मुस्लिम बांधवांनी संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची अनोख्या पद्धतीने सेवा करत हिंदू-मुस्लिम एकतेचं दर्शन घडवलं. माळेगावमध्ये संत सोपानकाका पालखी सोहळा दाखल झाला. यावेळी स्थानिक मुस्लिम बांधवांनी उन्हात चाललेल्या वारकऱ्यांसाठी खास सरबत, खजूर आणि पाण्याची व्यवस्था केली होती.
तसेच इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथेही मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शीरखुर्मा वाटप करण्यात आले. तर जनहित ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने मोहबते शरबत वाटप करण्यात आला. तसेच इंदापूर तालुक्यातील भिगवण गावातही श्री संत चांगावटेश्वर पालखी सोहळ्यातील वारकरी भक्तांना सरबत फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले.