जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील झिक्री गावाजवळील लोकसेवा हाॅटेल समोर मोटारसायकल आणि स्विप्ट कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 23 वर्षीय तरूण जागीच ठार झाल्याची घटना घडली. या घटनेत अन्य दोघे तरूण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जामखेड आणि अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना जामखेड- करमाळा रस्त्यावर घडली. या दुर्दैवी अपघाती घटनेमुळे नान्नज परिसरावर शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर असे की, जामखेडहून नान्नजच्या दिशेने जाणाऱ्या सिप्ट कारने नान्नजहून जामखेडच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात मोटारसायकलवरील इंजमाम अहमद पठाण (वय २३) रा. नान्नज ता.जामखेड हा तरूण जागीच ठार झाला. हा अपघात इतका भीषण होता की मोटारसायकलवरील इंजमाम हा तरूण रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पडला होता, या अपघातात सोहेल मस्जिद पठाण वय २२ व मुदस्सिर मस्जिद पठाण वय १८ हे गंभीर जखमी झाले हे दोघे सख्खे भाऊ या अपघातात गंभीर जखमी झाले आहे.यातील एकावर जामखेडमधील खाजगी रूग्णालयात तर एकावर अहमदनगर येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
सदर सिप्ट कार ही एका शिक्षकाची असुन हा शिक्षक जामखेडहून नान्नज गावाकडे भरधाव वेगाने चालला होता. यावेळी त्याच्या स्विफ्ट कारने मोटारसायकलला चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, डाव्या बाजूने चाललेली स्विफ्ट कार उजव्या बाजूच्या खदानीत जाऊन पल्टी झाली. सदर कारला दोन्ही बाजूला नंबर प्लेट नव्हती. कार चालक शिक्षक घटना घडताच घटनास्थळावरून जामखेड पोलिस स्टेशनला जाऊन हजर झाला. जखमींना मदत करण्याऐवजी तो शिक्षक घटनास्थळाहून फरार झाला होता. दरम्यान सदर सिप्ट कार चोरीची असल्याचा संशय नान्नज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान सदर घटनास्थळी जखमींना मदत करण्यासाठी नान्नज प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रूग्णवाहिकेला काही नागरिकांनी फोन केला असता रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकले नाही, दरम्यान घटनेची माहिती मिळताच नान्नज ग्रामस्थांनी खाजगी वाहनातून तिघा जखमींना उपचारासाठी जामखेडला दाखल केले. मयत इंजमाम या जखमीला वेळेत मदत मिळाली असती तर तो वाचला असता परंतू दुर्दैवाने जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याच्या मृत्यू झाला.
सदर मृतदेहावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच आमदार राम शिंदे यांचे स्वीय सहाय्यक डाॅ अल्ताफ शेख, भाजपा नेते प्रविण चोरडिया, सह आदींनी ग्रामीण रूग्णालयाला भेट दिली.
दरम्यान पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी घटनास्थळास भेट दिली. पोलिस नाईक बाळासाहेब तागड, अजय साठे, पोलिस काँस्टेबल संदिप राऊत, नवनाथ शेकडे, प्रविण पालवे, देशमाने सह आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. जामखेड पोलिस स्टेशनला या अपघाताबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस नाईक बाळासाहेब तागड करत आहेत.