कर्जत तालुक्यात 8 लाख 28 हजार रुपयांचा अवैध मद्याचा साठा जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहमदनगर पथकाची कारवाई
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहमदनगर येथील पथकाने कर्जत तालुक्यातील अवैध मद्य साठ्याचा अड्डा उध्वस्त करण्याची धडाकेबाज कारवाई पार पाडली या कारवाईत तब्बल 8 लाख 28 हजार रुपयांचा अवैध मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की, कर्जत तालुक्यातील चिलवडी शिवार, राशीन करमाळा रोडवर अवैध मद्याची वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग ब-2, अहमदनगर यांच्या पथकाला 18 ऑगस्ट 2022 रोजी मिळाली होती.
त्यानुसार पथकाने चिलवडी शिवारात धाड टाकत तब्बल 8 लाख 28 हजार 100 रुपयांचा अवैध मद्याचा मुद्देमाल जप्त केला. अवैध मद्याची वाहतुक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून सदर कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या वाहनामध्ये गोवा राज्य निर्मितीचा विदेशी मद्याचा साठा मिळून आला अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग अहमदनगरचे अधिक्षक यांनी दिली.
परराज्यातील मद्य, महाराष्ट्रात आणून त्याची अवैध विक्री करण्याचा आरोपीचा हेतू असल्याचे दिसून येते. या गुन्हयात बेकायदेशीरपणे परराज्यातील विदेशी मद्याचा साठा वाहतुक केल्याने, उत्तरेश्वर गोरख बदे, रा. वलटे वस्ती, उमरड, ता. करमाळा जि. सोलापूर या आरोपीस अटक करण्यांत आली आणि एक आरोपी फरार झालेला आहे.
या आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये अजूनही काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता असून या गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास श्री. आर. पी. दांगट दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, ब-२. अहमदनगर हे करीत आहेत. असे अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.