जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। परतीच्या जोरदार पावसामुळे जामखेड तालुक्यातील पाटोदा येथील भवर नदीवरील तात्पुरत्या स्वरूपाचा पुल वाहून जाण्याची घटना 6 रोजी मध्यरात्री घडली होती, यामुळे जामखेडहून कर्जत आणि श्रीगोंद्याला जाणारी वाहतुक बंद झाली होती. आज सलग दुसर्या दिवशीही या मार्गावरील वाहतूक बंद आहे, मात्र भवर नदीला आलेला पुर ओसरल्यामुळे आज 8 रोजी वाहून गेलेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
आढळगाव ते जामखेड या भागापर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. याच भागातील जामखेड ते अरणगाव या मार्गावरील पाटोदा (गरडाचे) या ठिकाणी भवर नदीवरील मुख्य पुलाचे काम सुरु आहे. या भागातील वाहतुकीसाठी ठेकेदार कंपनीने तात्पुरता मातीचा पुल उभारला होता.
मागील दोन दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे भवर नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नदीपात्रातील बायपास रस्त्यावरील पुल वाहून गेला होता. त्यामुळे जामखेडहून अरणगाव – कर्जत – श्रीगोंदा कडे जाणारी वाहतुक बंद झाली होती. त्यामुळे या भागातील वाहतूक काल 7 रोजी दिवसभर विस्कळीत झाली होती. काही वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करत जामखेड गाठले.
पाटोदा पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू
दरम्यान आज पाटोद्यातील भवर नदीचे पाणी कमी झाल्याने नदीवरील वाहून गेलेल्या तात्पुरत्या फुलाच्या दुरुस्तीचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे आज सायंकाळपर्यंत हा पूल वाहतुकीस खुला होण्याचा अंदाज आहे, पुल वाहतुकीस खुला होऊपर्यंत नागरिकांनी जामखेडला जाण्यासाठी प्रशासनाने सुचवलेल्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे आणि पाटोद्याचे माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी केले आहे.
परतीच्या पावसाने तारले
जामखेड तालुक्यातून वाहणाऱ्या सीना, विंचरणा आणि खैरी नदीच्या खोऱ्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या परतीच्या दमदार पावसामुळे या नद्यांसह उपनद्या खळाळून वाहत आहेत. काही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर काही नद्यांची पाणी पातळी कमी झाली आहे.
जामखेड तालुक्यातील बहुतांश छोटे मोठे प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. रब्बी हंगामासाठी परतीचा पाऊस फायदेशीर ठरत असल्याचे चित्र आहे. परतीचा पाऊस अजून सक्रीय राहिल्यास तालुक्यातील अपुर्ण प्रकल्प भरले जातील.
जामखेड तालुक्यातील या गावांचा संपर्क तुटला
- जामखेड तालुक्यातील गिरवली पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गिरवलीचा अरणगावशी संपर्क तुटला आहे.
- तर अरणगाव – आष्टी मार्गावरील सोलेवाडीतील पुलावरून पाणी वाहत असल्याने अरणगावचा आष्टीशी संपर्क तुटला आहे.
अरणगाव- कर्जत- श्रीगोंद्याहून जामखेडला जाणाऱ्या वाहनधारकांनी खालील मार्गाचा वापर करावा
- अरणगाव- कर्जत- श्रीगोंद्याहून जामखेडला जाणाऱ्या वाहनधारकांनी जामखेड तालुक्यातील पाटोदा येथील भवर नदीवरील पुल वाहून गेल्यामुळे पाटोदा जामखेड हा रस्ता आजही बंद आहे, याची नोंद घ्यावी. सध्या पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे.
- जामखेडला जाण्यासाठी आरणगाव पिंपरखेड फक्राबाद कुसडगाव जामखेड या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे अवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.
हवामान विभागाचा इशारा
महाराष्ट्रात येत्या 12 तारखेपर्यंत परतीचा पाऊस दमदार हजेरी लावणार असा हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.