Ram Shinde : कर्जत-जामखेडमध्ये आमदार प्रा राम शिंदे यांचाच बोलबाला, निकालानंतर समोर आलेल्या मतांच्या आकडेवारीचा अर्थ काय ? जाणून घ्या सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । कर्जत आणि जामखेड कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल समोर आले आहेत.दोन्ही बाजार समित्यांवर वर्चस्व मिळवण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे विरूध्द आमदार रोहित पवार यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या.दोन्ही तालुक्यातील मतदारांनी बहुमताचा स्पष्ट कौल दिला नाही. दोन्ही गटांचे 9 / 9 उमेदवार विजयी झाले. राज्यात अश्या स्वरूपाचा हा पहिलाच निकाल समोर आला आहे. कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यातून समोर आलेल्या निकालाच्या आकडेवारीनुसार कर्जत जामखेड मतदारसंघाची राजकीय हवा बदलल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात 2019 नंतर राजकीय परिस्थिती बदलली आहे.आमदार प्रा.राम शिंदे यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा गेल्या अडीच – तीन वर्षांत सातत्याने राष्ट्रवादीकडून वापरली गेली. पण नुकत्याच पार पडलेल्या कर्जत आणि जामखेड बाजार समिती निवडणुकीत आमदार प्रा राम शिंदे यांच्या गटाने दोन्ही तालुक्यात 9-9 जागा जिंकत ‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’ ची झलक दाखवली आहे.
या निवडणुकीत मतदारांनी रोहित पवारांना आपला हिसका दाखवला. रोहित पवारांनी गेल्या अडीच तीन वर्षात केलेल्या मनमानी कारभाराला मतदारांसह कार्यकर्त्यांनी चांगला धडा शिकवला आहे. हेच कर्जत आणि जामखेड बाजार समिती निकालावरून स्पष्ट होत आहे. हाती आलेल्या निकालाच्या आकडेवारीनुसार मतदारसंघात आमदार प्रा.राम शिंदे यांच्या बाजूने राजकीय हवा फिरू लागल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
जामखेड बाजार समितीसाठी रविवारी मतदान पार पडले. रविवार रात्री उशिरापर्यंत चाललेल्या मतमोजणीत जामखेडरांचा कौल समोर आला. या निवडणुकीत आमदार प्रा.राम शिंदे विरूध्द आमदार रोहित पवार, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, खासदार डॉ.सुजय विखे गट असा सामना झाला होता. सगळे एकत्र येऊनही आमदार प्रा.राम शिंदे यांनी एकहाती 9 जागांवर विजय मिळवला. तर राष्ट्रवादीतील राळेभात गटाने 7 जागा जिंकल्या तसेच खासदार सुजय विखे गटाने 2 जागा जिंकल्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी अक्षरशा: भुईसपाट झाली. जागावाटपात राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या चारही जागांवर राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला. जामखेड तालुक्यातील गाव कारभाऱ्यांनी आमदार रोहित पवार यांना नाकारले. अगामी काळात मतदारसंघात राजकीय परिवर्तनाचे वारे वेगाने वाहणार असेच संकेत यातून मिळाले आहेत.
जामखेड बाजार समिती निवडणुकीत सर्व उमेदवारांना मिळालेल्या मतदानाच्या आकडेवारीची बेरीज केली असता जामखेड तालुक्यात भाजपच नंबर वन असल्याचे दिसत आहे. भारतीय जनता पार्टी प्रणित स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी जामखेड बाजार समिती निवडणुकीत छत्रीने एकुण 4519 मतदान घेतले तर विरोधी पॅनलने 4445 मतदान घेतले. जामखेड बाजार समितीसाठी झालेल्या एकुण मतदानात भाजपने 74 मते अधिक मिळवत आघाडी घेतली.तसेच कर्जत तालुक्यात छत्रीने (भाजपने) एकुण 7242 घेतली तर कपबशीने (राष्ट्रवादी) 7088 मते घेतली. यामध्ये भाजपने 154 अधिक मते घेतली. यावरून कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपच नंबर वन असल्याचे स्पष्ट होत आहे.
कर्जत – जामखेड मतदारसंघात गेल्या अडीच तीन वर्षात अनेक मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या, आमदार प्रा राम शिंदे यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याच्या राजकीय वल्गना अनेकदा करण्यात आल्या खऱ्या पण ग्रामपंचायत निवडणुकांनंतर आता पार पडलेल्या कर्जत आणि जामखेड बाजार समिती निवडणुकीत मतदारांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. दोन्ही तालुक्यातील निकालात मतदारसंघातील मतदारांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पॅनलचे 50 टक्के उमेदवार निवडून दिले आहेत. तसेच मतांच्या टक्केवारीत अधिक वाढ झाली आहे. भाजपसाठी ही अतिशय आशादायक बाब ठरली आहे.
मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या विरोधात नाराजीची लाट वेगाने सक्रीय झाल्याचे आता स्पष्ट दिसू लागले आहे.आमदार राम शिंदे यांनी मतदारसंघाची हाती घेतलेली बांधणी, शिस्तबद्ध नियोजन, कार्यकर्त्यांवर दाखवलेला विश्वास, कार्यकर्त्यांना ताकद देण्याची घेतलेली भूमिका, विकास कामांचा सुरु असलेला धडाका, तसेच मतदारसंघातील जनतेशी वाढवलेला संपर्क या गोष्टीमुळे मतदारसंघात आमदार प्रा.राम शिंदे यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली आहे. आमदार प्रा राम शिंदे यांचा वाढता जनाधार भाजपच्या गोटात ऊर्जा आणि उत्साह वाढवणारा ठरू लागला आहे. दोन्ही तालुक्यातील भाजप एकसंधपणे काम करत आहे. याचा चांगला फायदा बाजार समिती निवडणुकीत भाजपला झाला.