ऊसतोड न मिळाल्याने शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, ऊस पेटवून देत केली आत्महत्या

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. ऊस तोड लवकर व्हावी यासाठी शेतकरी कारखान्याकडे चकरा मारत आहेत परंतू अनेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊसतोडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. कारखान्यांविरोधात शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त होत आहे. अश्यातच शेतकरी आता टोकाचे पाऊल उचलू लागले आहेत.

ऊसाला तोड मिळत नसल्याने हतबल झालेल्या शेतकर्‍याने ऊस पेटवून देत विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना जोहरापूर ( ता. शेवगाव) येथे घडली. जनार्धन सिताराम माने (वय ७०) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, जोहरापूर येथील शेतकरी जनार्धन माने यांचा पावणेतीन एकर ऊस खामगाव शिवारात गट नंबर ९ मध्ये आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे माने यांचा ऊस बाधीत झाला होता. त्यामुळे सरकारचा निर्णयानुसार पूर क्षेत्रातील ऊसाला प्राधान्याने तोड मिळणे आवश्यक होते.

मात्र ऊसतोडणीचा हंगाम संपत आला असल्याने ऊसाला तोड मिळण्यासाठी त्यांनी साखर कारखान्याकडे चकरा मारायला सुरुवात केली. मात्र तरी देखील तोड मिळत नसल्याने हतबल झालेल्या माने यांनी मंगळवार दि. ५ रोजी दुपारी २ च्या सुमारास ऊस पेटवून देत शेतात विषारी औषध प्राशन केले.

त्यांना तातडीने शेवगाव येथील नित्यसेवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र उपचारा दरम्यान त्यांचे बुधवार दि. ६ रोजी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परीवार आहे. या घटनेने ऊसाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान शेवगाव तालुका चार कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात येत असतांना देखील शेतकर्‍यांच्या ऊसाला तोड मिळत नाही. मोठ्या मेहनतीने पिकवलेला ऊस तोडणीसाठी कारखान्याकडे वडीलांनी खूप वेळा गयावया केली. मात्र त्यांना यश आले नसल्याने त्यांनी हतबल होवून हा टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप मयत माने यांचा मुलगा संतोष माने यांनी केला आहे. याबाबतचा जबाब त्यांनी पोलीस ठाण्यात दिला. पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पो. काँ. रामेश्वर घुगे हे करीत आहेत.