जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । सहा आमदारांचा समावेश असलेल्या विधिमंडळाच्या विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण समितीच्या पथकाने बुधवारी जामखेड तालुक्याचा दौरा केला. विविध ठिकाणी भेटी देत विकास कामांची पाहणी केली. रखरखत्या उन्हात जामखेड दौर्यावर आलेल्या समितीने तालुक्यातील कामे पाहून समाधान व्यक्त केले.
बुधवारी दुपारी विधीमंडळाच्या विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण समितीच्या पथकाने जामखेड व खर्डा या ठिकाणी भेट देत विकास कामांची पाहणी केली. तसेच नव्या कामांची माहिती घेतली. समितीने जामखेड शहरातील मराठी शाळेचे भूमीपूजन केले.त्याचबरोबर ऐतिहासीक खर्डा येथील विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. स्थानिक आमदार रोहित पवार यांच्या कामाची समितीने स्तुती केली.
या समितीत आ. शांताराम मोरे यांच्यासह आ.गोपीचंद पडळकर, आ. संजय दौंड, आ. बळवंत वानखेडे, आ. रत्नाकर गुट्टे आ. रोहित पवार यांचा समितीत समावेश होता. समितीने खर्डा येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला, स्वराज ध्वज, सिताराम गड, संत गिते बाबा समाधी परिसराला भेटी दिल्या.
त्यानंतर खर्डा शहरात तांडावस्ती सुधारणा योजनेअंतर्गत करण्यात आलेली कामे व सुरू असलेली नवीन कामे यांना भेटी देऊन कामांची पाहणी केली.
समितीने लावली लग्नाला हजेरी
वडार समाजाच्या एका आत्महत्या केलेल्या तरुणाच्या मुलीच्या विवाह समारंभात समितीने हजेरी लावली व वधुवरांना शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थितांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या. हा विवाह सोहळा सिताराम गडावर पार पडला.
पडळकर आले आणि काही न बोलताच निघून गेले
विधिमंडळ समितीत समावेश असलेले भाजपा आमदार गोपीचंद पडळकर या दौर्यात उशिरा सहभागी झाले, दौर्यात त्यांनी शांत राहणे पसंत केले, कुठलीच प्रतिक्रिया न देता त्यांनी कामांची पाहणी केली आणि ते पुढच्या दौर्याला निघून गेले, ऐरवी वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या आमदार गोपीचंद पडळकरांची शांत भूमिका जामखेड तालुक्यात चर्चेची ठरली आहे.