स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : अहमदनगर जिल्ह्यातील 9 लाख 39 हजार 481 घरांवर तिरंगा फडकणार, हर घर तिरंगा अभियान !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात, नायक, क्रांतीकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरूपी जनमाणसात रहावी. या उद्देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यभरात राबविण्यात येत आहे.
11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार “हर घर तिरंगा” हा उपक्रम अहमदनगर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. “हर घर तिरंगा” या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. (Independence Amrit Mahotsav, tiranga will be flown on 9 lakh 39 thousand 481 houses in Ahmednagar district, Har Ghar tiranga campaign)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याबाबतच्या नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत डॉ. भोसले बोलत होते. यावेळी जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यावेळी म्हणाले, “हर घर तिरंगा” या उपक्रमात लोकसहभाग महत्वाचा असून जिल्ह्यातील 9 लाख 39 हजार 481 घरांवर भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकाविण्याचे नियोजित आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावागावातील, नागरीकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा, यासाठी सर्व जनतेचा सहभाग आवश्यक आहे.
“हर घर तिरंगा” या उपक्रमासाठी शहरात महानगरपालिकेचे आयुक्त समन्वय अधिकारी असून तालुका पातळीवर गटविकास अधिकारी समन्वय अधिकारी आहेत. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील मोठ्या पुरवठादारांकडून आणि बचत गटाच्या माध्यमातुन तिरंगा ध्वज बनवून घेण्यात येणार असून शहरात व तालुक्यात, गावात विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्यातील ज्या संस्थांना, व्यक्तींना आपल्या मार्फत राष्ट्रीय ध्वज, डोनेट किंवा उपलब्ध करुन द्यायचा असेल त्यांनी तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयांशी, तसेच शहरासाठी महानगरपालिका कार्यालयाशी संपर्क साधावा असे त्यांनी यावेळी सांगितले.
अहमदनगर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यावेळी म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यामध्ये प्रशासनातर्फे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. “हर घर तिरंगा” हा उपक्रमांतर्गत 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 दरम्यान शासनाच्या नियमानुसार ध्वज 30 इंच बाय 20 इंच आकाराचा किंवा लांबी रुंदीचे प्रमाण 3:2 आयताकार आकारात असावा, तिरंगा ध्वज (झेंडा) फक्त कापडी असावा.
अहमदनगर जिल्ह्यातील, तालुक्यातील प्रत्येक शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय आवारात राष्ट्रीय ध्वज उभारण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक नागरीकांनी सुध्दा तिरंगा ध्वज विकत घेऊन आपल्या घरावर, इमारतीवर, खाजगी आस्थापनेवर, राष्ट्रध्वज फडकावयाचा आहे. या ध्वजाची किंमत 30 रुपये आहे.
जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या वर्गणीतुन “हर घर तिरंगा” या उपक्रमासाठी 75 हजार ध्वज, तालुक्यातील व ग्रामीण भागातील जनतेला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नागरीकांनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवावा असे आवाहन येरेकर यांनी केले.
स्वराज्य अमृत महोत्सव उपक्रम
अहमदनगर जिल्ह्यात दि. 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या काळात स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात यावा. या कालावधीमध्ये जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत पातळीवर सांस्कृतिक कार्यक्रम, निबंध स्पर्धा, प्रदर्शन, मॅरेथॉन, प्रभात फेरी आदी कार्यक्रम आयोजित करण्यात यावे.
जिल्हा व तालुका पातळीवर हुतात्मा स्मारकांची डागडुजी, देखभाल आणि दुरूस्ती करून त्यांचे सुशोभीकरण करावे. स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे सभा घेण्यात याव्यात. 15 ऑगस्ट 2022 रोजी मुख्यालयाच्या ठिकाणी “तिरंगा बलुन” सोडण्यात येईल. याच दिवशी 75 फुट उंचीचा राष्ट्रध्वज जिल्हा स्तरावर उभारण्यात येईल.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे बोधचिन्ह व संविधान स्तंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभारण्यात येईल. आपल्या घरावर ध्वज उभारतांना नागरीकांनी ध्वजाचा अवमान होणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. लोकसहभागातून हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले आहे.