कायद्यापुढे सर्व समान, समाजाने महिलांविषयीची मानसिकता बदलावी, सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर – प्रथम वर्ग न्यायाधीश वैभव जोशी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कायद्यापुढे सर्व नागरिक समान आहेत. कायद्यामुळे स्त्री-पुरुष भेदभाव केला जात नाही.महिला सक्षमीकरणाची चळवळ अधिक गतिमान करण्याची आवश्यकता आहे.महिला सक्षमीकरणासाठी कायदा नेहमीच महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल, असे प्रतिपादन जामखेड तालुका प्रथम वर्ग व दिवाणी न्यायाधीश वैभव जोशी यांनी केले.
जामखेड तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त कायदे विषयक जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी न्यायाधीश वैभव जोशी बोलत होते.यावेळी तालुका विधी सेवा समितीचे सचिव तथा गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, ऍड. नितीन घुमरे, ऍड. अल्ताफ शेख, ऍड.एम.आर.कारंडे, विस्ताराधिकारी गायकवाड, अधीक्षक चौसाळकर,अनिल चव्हाण सह आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना न्यायाधीश वैभव जोशी म्हणाले की, कायद्याने सर्व महिला पुरुष समान असून समाजाने आपली मानसिकता बदलली पाहिजे. कोणत्याही क्षेत्रामध्ये स्त्रिया कमी नसून आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्या यशाची शिखरे पादाक्रांत करत आहेत. महिलांना पाठबळ दिल्यास त्याही विविध क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकतात. याची अनेक उदाहरणे आपण आजच्या काळात पाहू शकतो.
यावेळी तालुका विधी सेवा समितीचे सचिव तथा गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले की, महिला हा वंचित घटक मानून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी मागील अडीच वर्षापासून प्रयत्न करत आहे.सिंचन विहीर, घरकुल तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद सेस फंडातील योजनांमध्ये महिलांना विशेषता: विधवा एकल महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिला तसेच कोरोना काळामध्ये विधवा झालेल्या महिलांना सिंचन विहिरीचा लाभ मोठ्या प्रमाणात पंचायत समितीच्या माध्यमातून देण्यात आला आहे. बचत गटाच्या माध्यमांतून विविध प्रकारच्या योजना, कर्ज उपलब्ध करून देऊन महिला सक्षमीकरणासाठी जामखेड पंचायत समिती सातत्याने प्रयत्न करत आहे.
यावेळी ऍड. नागरगोजे, ग्रामसेविका श्रीमती पटेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रीमती मीनाक्षी कुलकर्णी यांचा पदोन्नती झाल्याबद्दल न्यायाधीश वैभव जोशी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक प्रशांत सातपुते यांनी केले तर विस्तार अधिकारी श्री बी.के माने यांनी आभार मानले. कार्यक्रमाला पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, तालुक्यातील वकील, पत्रकार तसेच महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.