बैठक कुठे होणार हे महत्वाचं नसून मार्ग निघणं महत्वाचं, चोंडीतील अंदोलकांचे म्हणणे सरकारला कळवणार – आमदार प्रा.राम शिंदे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : धनगर समाजाचे सर्व संघटना व नेते म्हणायचे ‘ड’ चा ‘र’ झाला पाहिजे. मी मंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर त्यांनी 24 तासाच्या आत महाराष्ट्रात धनगड राहत नसून धनगरच राहतात असे राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दिलं होतं. हे पत्र दिल्याच्यानंतर हा मुद्दा आता महाराष्ट्रात कोणीही नेता, कुठलीही संघटना घेत नाही. याचा अर्थ काही ना काही प्रक्रिया सुरु झालेली आहे. त्यामुळे हाही निर्णय महत्वाचा होता, असे सांगत चोंडीतील अंदोलकांची जी भूमिका आहे ती सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम मी करत आहे, असे आमदार प्रा राम शिंदे म्हणाले.
धनगर समाजाला घटनेने दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी यशवंत सेनेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी या जन्मगावी आमरण उपोषणाचे अंदोलन हाती घेतले आहे. या अंदोलनाची शासनाने दोनदा दखल घेतली आहे, मात्र अजूनही ठोस तोडगा निघालेला नाही. चोंडी येथे सुरू असलेल्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस होता. उपोषणस्थळी आमदार प्रा.राम शिंदे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उपोषणकर्त्या अंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. व त्यांची भूमिका जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नांवरून मुंबई बैठक पार पडली. या बैठकीत धनगर समाजाचे सर्वपक्षीय नेते व यशवंत सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. परंतू उपोषणकर्त्यांचे म्हणण असं आहे की, धनगर समाज हा अनुसूचित जमातीत आहे. जे काही करायचे असेल ते करा पण धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
त्या मागणीच्या अनुषंगाने सरकारने काही पावलं उचलले आहेत. सरकारने जी पावलं उचललीत आहे त्यात त्यांनी जरा स्टेप सांगितल्यात, त्या यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मान्य नाहीत. ते दोन दिवसांनी सर्वांशी चर्चा करून कळवणार होते. म्हणून आज त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांची बाजू ऐकुन घेतली, असे यावेळी बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले,
शिंदे पुढे म्हणाले की,निर्णय घेणारा मी नाही, निर्णय सरकार घेणार आहे. मी समाजाचा म्हणून, चोंडी गावचा नागरीक म्हणून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जन्मस्थळापाशी अंदोलन होत असल्याने माझं कर्तव्य आहे की, याच्यातून मार्ग निघाला पाहिजे. यशवंत सेनेच्या अंदोलकांची जी मागणी आहे. त्यावर चर्चा होणं आणि मार्ग निघणं हे महत्वाचं आहे. त्याचं जे काही म्हणणं आहे ते मी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना कळवणार आहे. त्यानंतर ते सरकारशी बोलतील असे यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांनी स्पष्ट केले.
सरकारला जर यापुढची चर्चा करायची असेल तर ती यापुढे चोंडीतील अंदोलनस्थळीच होईल, असा निर्णय अंदोलकांनी घेतला आहे. यावर बोलताना आमदार प्रा.राम शिंदे पुढे म्हणाले की, बैठक कुठं होणं हे महत्वाचं नसून उपोषणार्थींच्या मागणीवर मार्ग निघणं हे महत्वाचं आहे,असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपोषणकर्ते आण्णासाहेब रूपनवर, सुरेश बंडगर, यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले, माणिकराव दांगडे, प्रदेश महासचिव नितिन धायगुडे, प्रदेश उपाध्यक्ष समाधान पाटील, राष्ट्रीय सल्लागार गोविंद नरवटे, अक्षय शिंदे सह आदी उपस्थित होते.