जामखेड बसस्थानक परिसर जलमय, प्रवाशी बेहाल, पुढारी ढाराढूर, प्रवाश्यांच्या आरोग्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड शहरात गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे शहरातील जामखेड बस स्थानक परिसर जलमय झाला आहे. यामुळे प्रवाश्यांना पाण्यातून वाट काढत बसस्थानकात जावे लागत आहे. प्रवाश्यांचे हाल होत असल्याचे दिसत आहे.
पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेल्या जामखेडच्या बसस्थानक स्थानकावर मराठवाड्यातील बसेस मोठ्या प्रमाणात थांबतात. मराठवाड्याच्या सरहद्दीवरील जामखेड बसस्थानकावर प्रवाश्यांची नेहमी वर्दळ असते.अश्या महत्वाच्या गजबजलेल्या बसस्थानकावर प्रवाश्यांना मात्र घाण पाण्यातून वाट काढत बसस्थानकावर जावे लागत आहे. विशेषता: महिला, वृध्द आणि विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
जामखेड बसस्थानक परिसरात बसस्थानकासमोरील भागात नाल्या नसल्यामुळे घाण पाणी आणि पावसाचे पाणी बसस्थानक परिसरात जमा होत असल्याचा प्रकार होत आहे. असे असले तरी बसस्थानक परिसरात जमा होणार्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था केल्यास प्रवाश्यांची नाहक त्रासातून सुटका होऊ शकते. परंतू बसस्थानक प्रशासनाचे जे जबाबदार अधिकारी आहेत तेही या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचेच बसस्थानक परिसरात निर्माण झालेल्या चित्रावरून अधोरेखित होत आहे.
जामखेड बसस्थानक परिसरात साचलेल्या पाण्याची तातडीने निचरा करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशी करत आहेत. ऐरवी कुठल्याही प्रश्नांवर आवाज उठवणारे पुढारी सुध्दा ढाराढूर असल्याचे चित्र आहे. जामखेड बसस्थानक परिसरात दुर्गंधीयुक्त पाणी साचत असल्याने प्रवाश्यांचा आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान याबाबत जामखेडच्या आगार प्रमुखांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.